December 5, 2022
independent mla prakash awade

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : बदलत्या राजकीय समीकरणात आतापर्यंत भाजपचे सहयोगी सदस्य असलेले माजी मंत्री, अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे लवकरच भाजप प्रवेश करत हाती कमळ घेणार आहेत. आगामी निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आवाडे, राहुल आवाडे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

राज्यसभा आणि विधानपरिषद या पाठोपाठच्या निवडणुकीत भाजपची सरशी झाली. पहिल्या निवडणुकीत कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. यानंतर भाजपने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. बदलता राजकीय प्रवाह लक्षात घेऊन अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला केवळ पाठिंबा न देता भाजपच्या झेंडय़ाखाली निवडणुका लढण्याची नवी भूमिका घेतली आहे.

गेल्या काही दिवसातील कार्यक्रमात आमदार आवाडे यांनी वारंवार ‘भाजप, भाजप आणि भाजप’ असा उच्चार करण्यास सुरुवात केली आहे. यापुढील लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या माध्यमातून लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये केलेल्या कामाने प्रभावित होऊन भाजपवासी झालो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आवाडे कुटुंबीय भाजपमध्ये गेल्याने जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढण्यास मोठी मदत होणार आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक व महाडिक परिवार, आमदार विनय कोरे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर तसेच आवाडे परिवार एकत्रित राहिल्याने जिल्ह्यात पिछाडीवर राहिलेल्या भाजपला नवी ऊर्जा मिळू शकते.

चार वर्षांपूर्वी आवाडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी काश्मीर मुद्यावर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करीत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांचा पराभव करून ते अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. निकालानंतर त्यांनी लगेचच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपला पाठिंबा दिला. तेव्हा त्यांनी शिवसेनेत यावे यासाठी संपर्क साधला होता ; पण त्यांनी नकार देत भाजपचीच साथ कायम ठेवली होती. राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीत अपक्षांना महत्त्व प्राप्त झाले असताना त्यांनी भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज सूचक म्हणून भरला. विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांना उमेदवार संपर्क साधत होते; तथापि आपण भाजपवासी झालो आहे, असेच आवाडे सांगत राहिले. त्यांचा भाजप प्रवेश ही केवळ औपचारिकता उरली असून ती कधी पूर्ण होणार आणि भाजपमध्ये त्यांना नेमके काय स्थान मिळणार याची चर्चा होत आहे. तर आता राज्यात भाजप झ्र् एकनाथ शिंदे गटाची सत्ता आकाराला येत असल्याने आमदार आवाडे यांना मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याची नामी संधीही मिळताना दिसत आहे.

काँग्रेस, अपक्ष ते भाजप

प्रकाश आवाडे यांनी पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकली असून ते दोन वेळा मंत्रीही होते. सर्वाधिक ऊस गाळप करणारा जवाहर साखर कारखाना, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आवाडे इचलकरंजी बहुराज्य शेडय़ुल्ड सहकारी बँक,  प्रोसेसर्स, टेक्साईल पार्क, मेगा पॉवररलुम प्रकल्प आदी विविध सहकारी संस्था, डीकेटीई शिक्षण संस्था यावर प्रकाश आवाडे यांचे नेतृत्व आहे. त्यांचे वडील माजी खासदार, माजी उद्योग राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे, जनता बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे अशा तीन पिढय़ा राजकारणात सक्रिय आहेत.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.