February 2, 2023
sp esha jadhav

मुंबई : महाराष्ट्राच्या दोन युवतींनी कुवेत येथे सुरू असलेल्या आशियाई युवा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पदके मिळवून दिली. मुलींच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पालघर जिल्ह्यातील ईशा जाधवने रौप्य, तर सातारा जिल्ह्यातील अनुष्का कुंभारने कांस्यपदक पटकावले. राष्ट्रीय युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या १६ वर्षीय ईशाने ५६.१६ सेकंद अशी वेळ देताना रौप्यपदक आपल्या नावे केले. पंधरा दिवसांपूर्वी आपला सोळावा वाढदिवस साजरा करणाऱ्या ईशाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. ईशा अमेय क्लासिक क्लब येथे संदीप लटवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

कऱ्हाड (जि. सातारा) येथे माजी राज्य क्रीडा मार्गदर्शक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या अनुष्काने ५७.३६ सेकंद अशी वेळ देताना कांस्यपदक जिंकले. तिने जुलै महिन्यात कोलंबिया येथे झालेल्या जागतिक कुमारी स्पर्धेतही भाग घेतला होता. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आकाश यादवने १९.३७ मीटरवर गोळा फेकून भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. यात भारताच्या सिद्धार्थ चौधरीने कांस्यपदकाची कमाई केली. सिद्धार्थने १९ मीटर अंतरावर गोळा भिरकावला. मुलांच्या १५०० मीटर शर्यतीत अमित चौधरीने ४ मिनिटे व ४.५९ सेकंद वेळ देत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

मुलींच्या थाळीफेकीत निकिता कुमारीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. निकिताने ४४.१४ मीटर अंतरावर फेक केली. राष्ट्रीय स्पर्धेत लक्षद्वीपसाठी पदक जिंकणारी पहिली खेळाडू ठरलेल्या मुबस्सिना मोहमने लांब उडीत ५.९१ मीटर अंतरावर उडी मारताना पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याची किमया केली. पोल व्हॉल्टमध्ये कुलदीप कुमारने ४.८० मीटर उडी मारताना कांस्यपदक जिंकले. Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.