November 27, 2022
exam

सांगली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत इस्लामपूरचा अजिंक्य बाबुराव माने याने देशातील गुणवत्ता यादीत ४२४ वा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या घवघवीत यशाचे परिसरातून कौतुक होत आहे. अजिंक्यचे माध्यमिक शिक्षण आदर्श हायस्कूल, इस्लामपूर, अभियांत्रिकी पदवी राजारामबापू इन्स्टिटय़ूट येथे तर पदव्युत्तर पदवी एनआयटी सूरत येथे मिळवली. एम टेक पदवीनंतर काही वर्षे नोकरीही केली होती. गेली तीन वर्षे तो यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होता. तिसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळवले आहे. आपल्या यशात आई-वडील यांचे प्रोत्साहन, मोठे दोन भाऊ यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले असे मत अजिंक्य याने व्यक्त केले.

सातत्यपूर्ण अभ्यास, अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नाची जाण, विशेष करून समाजशास्त्र विषयाचा अधिक गंभीरपणे केलेला अभ्यास यामुळे यश प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. अजिंक्य याचे आई-वडील शिक्षक आहेत, एक भाऊ यूपीएससीच्या घेण्यात आलेल्या इंडियन डिफेन्स इस्टेट सव्‍‌र्हिसमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत, दुसरे बंधू जर्मनीत मोठय़ा कंपनीत अधिकारी आहेत. अजिंक्य माने यांचे मूळ गाव नेर्ले (ता. वाळवा) हे आहे.

कोल्हापुरातील अभियंत्यांचे यश

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन अभियंत्यांनी केंद्रीय लोकसेवा स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे. स्वप्निल तुकाराम माने याने फळविक्रेता ते सनदी अधिकारी अशी झेप घेतली आहे. तर आशिष अशोक पाटील या प्राथमिक शिक्षकाच्या मुलाने नेत्रदीपक झेप घेतली आहे.  केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यामध्ये साळशी (ता. शाहुवाडी) येथील आशिष अशोक पाटील यांनी ५६३ तर सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील स्वप्निल तुकाराम माने याने ५७८ वी रँक मिळविली.

सोलापूरचा अनय नावंदर देशात ३२ वा

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सोलापूरचा अनय नितीन नावंदर देशात ३२ वा आला. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याने कोणत्याही प्रकारची खासगी शिकवणी न लावता स्वत: जिद्द बाळगून रात्रंदिवस अभ्यास करून देशात सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या या स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे. अनय याचे वडील नितीन श्रीनिवास नावंदर हे व्यवसायाने सनदी लेखापाल (सीए) आहेत. तर मातोश्री अपर्णा नावंदर अलिबाग येथे न्यायाधीश आहेत. त्याचे आजोबा श्रीनिवास नावंदर हेदेखील न्यायाधीश होते. त्यामुळे घरात सुरूवातीपासून शैक्षणिक वातावरण आहे. त्याची बहीण निधी ही अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.