
कोल्हापूर : ठाकरे सरकारने संभाजीनगरचे नाव बदलण्याचा निर्णयाला एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करताना त्यानीं किमान धर्मवीर आनंद दिघे यांचे तरी स्मरण करायला हवे होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात हिंदुत्वाचा मुर्दा पाडणाऱ्या शिंदे यांना कपाळावर टिळा लावण्याचाही नैतिक अधिकार राहिलेला नाही, असा टोलाही शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी येथे शुक्रवारी लगावला.
आज येथे जिल्ह्यातील माजी आमदार,जिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात राऊत यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले.
फडणवीस मुख्यमंत्र्यांचा माईक ओढला आहे उद्या ते त्यांची पॅन्ट ओढतील.नंतर त्यांना उघडे करून सोडतील, अशी टीका करून राऊत यांनी खोक्यांना बळी पडलेल्यांचे राजकीय आयुष्य नाहीसे होणार आहे, असा इशारा शिंदे आणि बंडखोर आमदारांना दिला. नारायण राणे आणि केसरकर हे येत्या काही दिवसात एकमेकांच्या जीवावर बसतील, असेही राऊत म्हणाले.
क्षीरसागरांची बेईमानी
शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याविषयी राऊत यांनी जोरदार टीका केली. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतच क्षीरसागरांची बेईमानीची लागलेली कीड मी स्वतः अनुभवली होती.त्यांनी मला आणि नाना पटोलेना घरी जेवायला बोलावले आणि जेवणाचा खर्च हा काँग्रेसचे सतेज पाटील यांच्याकडून घेतला, असा आरोप त्यांनी केला. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी क्षीरसागर यांचा उल्लेख करून पाया पडणारा माणूस पाय खेचायला मागे राहणार नाही, असा सावधगिरीचा इशारा चंद्रकांतदादा पाटील यांना उद्देशून दिला. क्षीरसागर यांनी विधानसभेची निवडणूक शिंदे गटाकडून लढवून दाखवावी शिवसेनेची ताकद दाखवून देऊ, असेही आव्हान त्यांना दिले.