February 2, 2023
एमचेस जलद बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश, अर्जुन, विदित उपांत्यपूर्व फेरीत

चेन्नई : विदित गुजराथी, अर्जुन एरिगेसी आणि डी. गुकेश या भारतीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंनी मंगळवारी एमचेस जलद ऑनलाइन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

उपांत्यपूर्व फेरीत गुकेशचा रिचर्ड रॅपपोर्टशी, एरिगेसीचा विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनशी, तर विदितचा यान-ख्रिस्तोफ डुडाशी सामना होणार आहे.

प्राथमिक फेरीत कार्लसनला पराभवाचा धक्का देणाऱ्या गुकेश आणि एरिगेसी यांनी अनुक्रमे दुसरे आणि चौथे स्थान मिळवत बाद फेरी गाठली. विदित आठव्या स्थानी राहिल्याने त्यालाही आगेकूच करण्यात यश आले. प्राथमिक फेरीच्या १५व्या आणि अखेरच्या फेरीत भारताच्या या तीनही बुद्धिबळपटूंनी विजयांची नोंद केली. गुकेशने रॅपपोर्टला, तर एरिगेसीने नेदरलँड्सच्या अनिश गिरीला पराभूत केले.

प्राथमिक फेरीच्या अखेरच्या दिवशी गुकेशला जर्मनीच्या व्हिन्सेन्ट केमेरकडून पराभव पत्करावा लागला. मात्र त्यानंतर त्याने भारताच्याच आदित्य मित्तल आणि रॅपपोर्टवर मात केली. दुसरीकडे, १२व्या फेरीअंती बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर असणाऱ्या विदितने १३ आणि १५व्या फेरीत अनुक्रमे मित्तल आणि डेव्हिड अ‍ॅन्टोन गुइजारोला नमवले. १४व्या फेरीत त्याने रॅपपोर्टला बरोबरीत रोखले. तसेच एरिगेसीने अनिश गिरीला पराभूत केल्याचाही विदितला फायदा झाला आणि त्याने बाद फेरी गाठली. कार्लसनने २६ गुणांसह प्राथमिक फेरीत अग्रस्थान मिळवले.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.