December 5, 2022
shiv sena rebels leader in kolhapur

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : शिवसेनेला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील तीन प्रमुख नेत्यांचा राजकीय प्रवास एकसमान राहिला आहे. खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या तिघांनीही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, अपक्ष आणि आता एकनाथ शिंदे असा जवळपास एकसारखाच प्रवास केला आहे.

राजकारणात साम्य, योगायोग नक्कीच असतात. पण ते कितपत विलक्षण असावेत याचा एक पट मंडलिक, माने, यड्रावकर या तिघांच्या राजकीय प्रवासातून उलघडतो. विविध पक्षांची वाट तुडवताना तिन्ही घराण्यातील पिढय़ांना यश- अपयश याच्याशी दोन हात करीत आजचे स्थान मिळवले आहे. तीन घराणी, तीन तालुके, भिन्न राजकीय परिस्थिती असताना त्यांच्यातील साम्य स्तिमित करणारे आहे.

शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून कोल्हापूर जिल्ह्यातील पाच प्रमुख नेत्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यातील मंडलिक, माने व पाटील या तिन्ही नेत्यांचा, त्यांच्या घराण्याचा राजकीय प्रवास एकाच लयीत पुढे गेला असल्याचा त्यांचा राजकीय इतिहास कथन करतो.

दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे राजकारण युवक काँग्रेसपासून सुरू झाले. याच पक्षाकडून ते कागल तालुक्यातून आमदार झाले. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर शरद पवार यांच्यासोबत ते राहिले. या पक्षाकडून ते कोल्हापूरचे खासदार झाले. पवार यांच्याशी मतभेद झाले त्या वेळी पवार यांच्यासह बडे नेते विरोधात असतानाही त्यांनी ही निवडणूक एकहाती जिंकली होती. त्यांच्यानंतर संजय मंडलिक यांनी राजकीय वारसा चालवला. संजय मंडलिक यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीचा तिरंगा वारसा सोडून हाती भगवा घेऊन शिवसेनेकडून पहिली लोकसभा निवडणूक लढवली. त्यांना यश आले नाही. गेल्या निवडणुकीत ते खासदार बनले. आता बदललेल्या राजकारणात ते शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.

तिन्ही पिढय़ांमध्ये खासदारकी

हातकांणगले तालुक्यातील माने घराण्याच्या तिन्ही पिढय़ांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली आहे. दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांनी इचलकरंजी मतदारसंघातून काँग्रेसकडून सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यांच्या स्नुषा निवेदिता माने यांनी पहिली लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. दुसऱ्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर त्या या पक्षाच्या माध्यमातून सलग दोनदा संसदेत पोहोचल्या. राष्ट्रवादीकडून संधी मिळत नाही, असे सांगत गेल्या लोकसभेच्या आधी मायलेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभेच्या पहिल्याच निवडणुकीत धैर्यशील माने हे शिवसेनेकडून विजयी झाले. आता ते शिंदे गटात डेरेदाखल झाले आहेत.

पदार्पणातच राज्यमंत्री

राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वडील दिवंगत शामराव पाटील यड्रावकर यांचा राजकीय वारसा चालवला आहे. शामराव पाटील यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून झाला. राज्यात युतीची पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा ते शिवसेनेत गेले. नंतर त्यांनी शिरो तालुक्यात तीन वेळा विधानसभेची अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पण विजय मिळवता आला नाही. राजेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली तरीही अपयश घराण्याची पाठ सोडत नव्हते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून विजयी झाले. त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधले. शिवसेनेच्या कोटय़ातून त्यांच्याकडे पदार्पणातच पाच खात्यांचे राज्यमंत्रीपद मिळाले. या इतक्या साऱ्या प्रवासानंतर आता यड्रावकर यांनी शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.