December 5, 2022
shivsena flag

कोल्हापूर : नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्याचे हादरे कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. जिल्ह्यातील राज्यमंत्री, आमदार, माजी आमदार यांनी शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला असून शिंदे यांनी त्यांना मोठी जबाबदारीसह निधी देण्याबाबत आश्वासित केले आहे. याच वेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांनी शिवसेनेला नव्याने ऊर्जा मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. गतवैभव प्राप्त करण्यासाठी शिवसेनेला राजकीय पटलावर टोकदार सामना करावा लागणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रिय असणाऱ्या यादीत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होता. या जिल्ह्यातून आमदार निवडून जाण्याचे त्यांचे स्वप्न हयातीतच पूर्ण झाले होते. तर खासदार होण्याचे स्वप्न त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी दोन खासदार निवडून आणून पूर्ण केले. कोल्हापुरात शिवसेनेचा आमदार एखाददुसरा असायचा, पण २०१४ सालच्या निवडणुकीत ही संख्या थेट सहावर गेली.

तथापि २०१९ सालच्या निवडणुकीत ही संख्या राधानगरी मतदारसंघातील प्रकाश आबिटकर या एकटय़ाच आमदारापुरती खालावली. निवडणुकीनंतर अपक्ष निवडून आलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आले. शिंदे यांनी वेगळी वाट चोखण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातून त्यांना साथ मिळाली. शिवसेनेत आपली घुसमट होत असल्याची आबिटकर यांची भावना होती. शिंदे यांच्या माध्यमातून राज्य मंत्रिपद मिळाल्याने यड्रावकर यांनी त्यांच्यासोबत राहण्यात हित असल्याचे ओळखले. मतदारसंघात साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी मिळाला असून शंभर कोटींची कामे सुरू झाली आहेत. याचे श्रेय शिंदे यांना असल्याने त्यांच्यासोबत राहण्यातच पुढे विकासकरण करता येणार आहे, असा त्यांचा हेतू आहे. त्यांच्यासोबत क्षीरसागर हेही गेल्याने शिवसेनेला धक्का बसला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर माजी आमदार, खासदार हेही शिंदेसोबत येतील, असाही दावा केला जात असल्याने शिवसेनेला फुटीचा धोका संभवत असल्याचे जाणवत आहे.

वादाची परंपरा 

कोल्हापुरातील शिवसेनेची वादाची परंपरा तशी गेली २०-२५ वर्षे जुनी आहे. गेल्या दहा वर्षांत तर जिल्हाप्रमुख – आजी, माजी आमदार यांचा जवळपास प्रत्येक मतदारसंघात वाद गाजत राहिला. त्याला संपर्कनेते, संपर्कप्रमुख यांच्याकडून खतपाणी घातले गेले. डिसेंबर महिन्यात कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेतील संघर्ष चव्हाटय़ावर आला होता. राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने यांनी सत्ताधारी गटाचे हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या विरोधात मातोश्रीवर तक्रारी करण्यात आल्या. या वादातून खासदार संजय मंडलिक, आमदार आबिटकर यांचे बंधू अर्जुन, बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्यासह सहा जणांनी स्वतंत्र आघाडी केली होती. यड्रावकर-माने या दोघांनाही जिल्हा बँकेचे दार बंद करण्यासाठी शिवसैनिक प्रयत्नशील राहतील, अशी गर्जना तेव्हा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली होती.

आता यड्रावकर, आबिटकर यांनी स्वत:हूनच शिवसेनेचे दार बंद करून घेतले आहे.

मतदारसंघाची समीकरणे

शिवसेनेमधील पाच माजी आमदारांपैकी चौघांनी ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचे ठरवले आहे. बदलत्या परिस्थितीत राजकारण करताना विधानसभा निवडणूक लढवून यश मिळवणे याची गणिते माजी आमदारांकडून घातली जात आहेत. जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे हे पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातून निवडून येतात. यामुळे येथे तेच उमेदवार असल्याने माजी आमदार सत्यजित पाटील यांना सेनेत राहण्याशिवाय मार्ग उरला नाही. अशीच अवस्था हातकणंगले मतदारसंघात आहे. हाही

मतदारसंघ कोरे यांच्या वाटणीला जाणार असल्याने माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी शिवसेनेत राहणे पसंत केल्याचे दिसते. यड्रावकर हे शिंदे यांच्यासोबत असल्याने त्यांना तेथून उमेदवारी मिळणार हे निश्चित असल्याने शिरोळमध्ये माजी आमदार उल्हास पाटील यांनी शिवबंधन कायम ठेवले आहे.

  नेत्यांचे पक्षांतर..  

कोल्हापुरातील शिवसेनेला खिंडार पडले असताना ही दरी बुजवून किल्ला अभेद्य ठेवणे आव्हानास्पद बनले आहे. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी कोल्हापुरातील शिवसेना पुन्हा बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यापूर्वी अनेकदा शिवसेनेने पूर्वीप्रमाणे सहा आमदार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. हे साध्य करायचे तर शिवसेनेला निम्म्या मतदारसंघात आपल्या जुन्या सहकाऱ्यांचाच सामना करावा लागणार आहे. उर्वरित ठिकाणी सक्षम उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. सत्तावर्तुळाबाहेर राहिलेल्या शिवसेनेला खासदार, माजी आमदार, पक्ष पदाधिकारी यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यांच्याकडून आणखी धक्के मिळाले तर पुढील वाटचाल आणखी काटेरी बनणार हे नि:संदेह.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.