November 27, 2022
former chess player raghunandan gokhale,

रघुनंदन गोखले (माजी बुद्धिबळपटू आणि प्रशिक्षक )

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचा मध्यंतर झाला असून, सहा फेऱ्यांअंती यजमान भारताच्या खुल्या विभागातील तिन्ही संघांनी प्रभावशाली कामगिरी केली आहे. अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेल्या दुसऱ्या मानांकित ‘अ’ संघाकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा केली जात होती. पाच फेऱ्या शिल्लक असताना या संघाला गुणतालिकेत सहावे स्थान मिळवण्यात यश आले आहे.

तसेच प्रतिभावान युवा ग्रँडमास्टर खेळाडू समाविष्ट असलेल्या ‘ब’ संघाने दमदार खेळ करताना तिसरे स्थान मिळवले आहे. त्यांच्याकडून डी. गुकेशने सहापैकी सहा सामने जिंकण्याची किमया साधली आहे. या संघाला सहाव्या फेरीत अर्मेनियाकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, या संघात गुकेशसह आर. प्रज्ञानंद, निहाल सरिन आणि नागपूरचा रौनक साधवानी यांसारख्या युवकांचा समावेश असल्याने त्यांच्याकडून काही चुका होणे स्वाभाविक आहे. परंतु भारताच्या ‘क’ संघाने सर्वाधिक प्रभावित केले आहे.

ऑलिम्पियाड स्पर्धेत यजमान म्हणून भारताला दोन्ही विभागांत प्रत्येकी दोन संघ खेळवण्याची मुभा होती. मात्र, एकूण संघांची सम संख्या करण्यासाठी भारताला आणखी एकेक संघ सहभागी करण्याची संधी मिळाली. भारताच्या ‘क’ संघांना सराव करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. या परिस्थितीतही भारताच्या खुल्या विभागातील ‘क’ संघाने नववे स्थान मिळवले आहे. त्यांनी आतापर्यंत केवळ एक सामना गमावला असून त्यांची ही कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. खुल्या विभागात जेतेपदासाठी अग्रमानांकित अमेरिकेचा संघ अजूनही प्रमुख दावेदार असला तरी भारतीय संघ त्यांना अखेपर्यंत झुंज देतील अशी मला आशा आहे.

महिला विभागात, अग्रमानांकित भारतीय ‘अ’ संघाने अपेक्षेप्रमाणे गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. या संघाने किंवा या संघातील एकाही खेळाडूने अजून सामना गमावलेला नाही, हे कौतुकास्पद आहे. कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका आणि तानिया सचदेव यांचा अनुभव भारतीय ‘अ’ संघासाठी लाभदायी ठरत आहे. दडपणात आपला खेळ कसा उंचावायचा आणि विजय कसा मिळवायचा, हे त्यांना ठाऊक आहे. याचा त्यांना पुढील पाच फेऱ्यांमध्ये फायदा होऊ शकेल. महिला विभागाच्या गुणतालिकेत अव्वल आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या अनुक्रमे भारत ‘अ’ आणि अझरबैजान या संघांतील लढत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने ही लढत जिंकल्यास त्यांचा जेतेपदाचा मार्ग सुकर होईल. (शब्दांकन : अन्वय सावंत)Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.