December 5, 2022
sp neeraj chopra

पीटीआय, युजीन : ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर अंतरावर भालाफेक करून प्रथमच जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नीरजसह रोहित यादवनेही पदकाच्या फेरीत स्थान मिळवल्याने भारतासाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला.

स्पर्धेच्या अ-गटात समावेश असलेला भारताचा तारांकित खेळाडू नीरजने कारकीर्दीतील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी साकारली. याच गटातून ८९.९१ मीटर अंतरावर भाला फेकत एकंदर अग्रस्थान मिळवणाऱ्या ग्रेनाडाच्या गतविश्वविजेत्या अँडरसन पीटर्सनंतर नीरजला दुसरा क्रमांक मिळवता आला. नीरजने पहिल्याच प्रयत्नात थेट पात्रतेचे अंतर गाठल्यामुळे उर्वरित दोन प्रयत्न करण्याची आवश्यकताच भासली नाही. पात्रता फेरीत प्रत्येक स्पर्धकाला तीनदा भालाफेक करता येते. यापैकी सर्वोत्तम कामगिरी ही ग्राह्य धरली जाते.

भारताच्या रोहितने पहिल्या प्रयत्नात ८०.४२ मीटर अंतरावर भालाफेक करीत ब-गटात सहावा आणि एकंदर ११वा क्रमांक मिळवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. त्याचा दुसरा प्रयत्न हा सदोष ठरला, तर तिसऱ्या प्रयत्नात ७७.३२ मीटर अंतर गाठता आले. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय आंतर-राज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत २१ वर्षीय रोहितने ८२.५४ मीटर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना रौप्यपदक जिंकले होते.

दोन्ही गटांतून ८३.५० मीटर अंतर गाठणाऱ्या किंवा सर्वोत्तम १२ स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी पात्र होता आले. अंतिम फेरी रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.०५ वाजता होणार आहे.

नीरजकडून २०१७च्या लंडन जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरीची अपेक्षा केली जात होती; परंतु ८२.२६ मीटर अंतरावर भालाफेक केल्याने थेट पात्रतेचे ८३ मीटर अंतर गाठण्यात तो अपयशी ठरला होता. त्यानंतर कोपरावरील शस्त्रक्रियेतून सावरत असल्याने २०१९च्या दोहा जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता.

टोक्यो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या चेक प्रजासत्ताकच्या जॅकूब व्हॅडलेचने पहिल्याच प्रयत्नात ८५.२३ मीटर अंतरावर भालाफेक केली. तो एकंदर चौथ्या स्थानासह अंतिम फेरीत दाखल झाला आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेआधी यंदाच्या हंगामात झालेल्या तीन स्पर्धापैकी नीरजने पीटर्सला दोनदा मागे टाकले आहे; परंतु स्टॉकहोम येथे ३० जूनला झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत पीटर्सने नीरजला मागे टाकले होते. ८९.९४ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी नीरजच्या खात्यावर जमा आहे.

जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून गणल्या जाणाऱ्या पीटर्सने कारकीर्दीत तीनदा ९० मीटरचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी ९३.०७ मीटर ही सर्वोत्तम कामगिरी त्याने मे महिन्यात दोहा येथे झालेल्या वर्षांतील पहिल्या डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना नोंदवली होती.

  • २०१७च्या लंडन जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नीरजकडून अंतिम फेरीची अपेक्षा होती; परंतु ८२.२६ मीटर अंतरावर भाला फेकल्याने थेट पात्रतेचे ८३ मीटर अंतर गाठण्यात तो अपयशी ठरला होता.
  • २०१९च्या दोहा जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कोपरावरील शस्त्रक्रियेतून सावरत असल्याने सहभागी होऊ शकला नव्हता.

दुहेरी सुवर्णयशाची संधी

नीरजने रविवारी प्रथम क्रमांक मिळवल्यास ऑलिम्पिक विजेतेपदापाठोपाठ जगज्जेतेपद पटकावणारा तो तिसरा अ‍ॅथलेटिक्सपटू ठरेल. याआधी, नॉर्वेच्या आंद्रेस थॉर्किल्डसन (२००८-०९) आणि चेक प्रजासत्ताकचा विश्वविक्रमवीर जॅन झेलेझनी (१९९२-९३ आणि २०००-०१ असे दोनदा) यांनी हा दुहेरी सुवर्णयशाचा पराक्रम दाखवला होता.

तिहेरी उडीपटू एल्डहोसचा पराक्रम

एल्डहोस पॉल हा जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील तिहेरी उडीची अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय ठरला आहे. पात्रता फेरीत १६.६८ मीटर अंतर गाठणाऱ्या एल्डहोसने अ-गटातून सहावे आणि एकंदर १२वे स्थान मिळवले. या स्पर्धेची अंतिम फेरीत रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.५० वाजता होणार आहे. ‘व्हिसा’ मिळवण्यात विलंब झाल्यामुळे २५ वर्षीय एल्डहोस उशिराने अमेरिकेत दाखल झाला. त्याने एप्रिलमध्ये झालेल्या फेडरेशन चषक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक कमावताना १६.९९ मीअर ही हंगामातील आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी साकारली होती. प्रवीण चित्रवेल आणि अब्दुल्ला अबूबाकर हे अन्य दोन स्पर्धक अनुक्रमे १६.४९ मीअर आणि १६.४५ मीटर अंतर गाठल्याने अपयशी ठरले. प्रवीणला अ-गटात आठवा आणि एकंदर १७वा क्रमांक मिळाला, तर अब्दुल्ला ब-गटात १०वा आणि एकंदर १९वा क्रमांक मिळाला. दोन्ही गटांतून १७.०५ मीटर अंतर गाठणाऱ्या किंवा सर्वोत्तम १२ स्पर्धकांना अंतिम फेरीत स्थान मिळाले. गेल्या महिन्यात चेन्नईत झालेल्या राष्ट्रीय आंतर-राज्य वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत प्रवीणने १७.१८ मीटर अंतरासह सुवर्णपदक प्राप्त केले होते.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.