December 5, 2022
sp neeraj chopra

पीटीआय, युजीन : ऑलिम्पिकविजेत्या नीरज चोप्राने रविवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष अ‍ॅथलेटिक्सपटू ठरला आहे. २४ वर्षीय नीरजला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी दावेदार मानले जात होते. चौथ्या प्रयत्नात नीरजने सर्वोत्तम ८८.१३ मीटर अंतरावर भाला फेकला. ही कामगिरी ग्रेनाडाच्या २०१९ मधील दोहा जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या अँडरसन पीटर्सनंतर दुसऱ्या क्रमांकाची ठरली.

गतवर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले होते. जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्याने ८८.५८ मीटर अंतर गाठत एकंदर दुसऱ्या क्रमांकासह अंतिम फेरी गाठली होती. नीरजच्या रौप्यपदकामुळे तब्बल दोन दशकांच्या कालावधीनंतर भारताचे नाव प्रथमच पदकतालिकेत झळकले आहे. भारतीय संघ संयुक्तपणे २८व्या क्रमांकावर आहे. एक रौप्य आणि पाच क्रीडापटू अंतिम फेरीत ही भारताची जागतिक स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

२४ वर्षीय पीटर्स हा जागतिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भालाफेकपटू ठरला आहे. पीटर्सने सहा प्रयत्नांपैकी तीनदा ९० मीटर अंतराचा टप्पा ओलांडला. त्याने पहिल्या प्रयत्नात ९०.२१ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ९०.४६ मीटर आणि सहाव्या प्रयत्नात ९०.५४ मीटर (सर्वोत्तम) अशी कामगिरी नोंदवली. नीरजसह कोणत्याही खेळाडूला त्याच्या तीन सर्वोत्तम कामगिरीपर्यंत पोहोचता आले नाही. चेक प्रजासत्ताकच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जॅकूब व्हॅडलेचने ८८.०९ मीटर अंतरासह कांस्यपदक पटकावले.

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांच्या हस्ते नीरजला रौप्यपदक देऊन गौरवण्यात आले. या वेळी प्रेक्षागृहातील भारतीय चाहत्यांसह अन्य अ‍ॅथलेटिक्सपटूंनी नीरजच्या नावाचा जयघोष केला.

नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला अ‍ॅथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. याचप्रमाणे नेमबाज अभिनव बिंद्रानंतरचे हे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले होते. बिंद्राने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला यश मिळवून दिले होते.

  • रोहित यादव १०वा

भालाफेक प्रकाराची अंतिम फेरी गाठणाऱ्या रोहित यादवने १०वा क्रमांक मिळवताना ७८.७२ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पात्रता फेरीत रोहितने ८०.४२ मीटर अशी कामगिरी नोंदवत एकंदर ११व्या क्रमांकासह अंतिम फेरी गाठली होती.

नीरजच्या गावात जल्लोष

नीरजने जागतिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केल्यानंतर त्याच्या पानिपत येथील गावात जोरदार जल्लोष करण्यात आला. हरयाणामधील पानिपतजवळील खांदरा गावचा रहिवासी असणाऱ्या नीरजच्या ऐतिहासिक यशाबद्दल हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांनी अभिनंदन केले. शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या नीरजच्या घरात बरेच पाहुणे जमले होते. त्याच्या कुटुंबीयांनी सर्वाना लाडू भरवत, तसेच नृत्य करत आनंद साजरा केला. ‘‘जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला यापूर्वी कांस्यपदक मिळाले होते. आता नीरजने एक पाऊल पुढे जात रौप्यपदक पटकावले आहे. त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे,’’ अशी प्रतिक्रिया नीरजचे वडील सतीश चोप्रा यांनी व्यक्त केली. तसेच ‘‘या पदकाला ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या पदकाइतकेच महत्त्व आहे. नीरजने आज खूप मोठे यश संपादन केले आहे,’’ असे नीरजचे काका भीम चोप्रा म्हणाले. नीरजच्या आजवरच्या प्रवासात भीम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

तिहेरी उडीत पॉल नववा

भारताच्या एल्डहोस पॉलला पुरुष तिहेरी उडीच्या अंतिम फेरीत नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. २५ वर्षीय पॉलने मिळालेल्या तीन संधींपैकी अनुक्रमे १६.३७ मीटर, १६.७९ मीटर आणि १३.८६ मीटर अंतरांवर उडय़ा मारल्या. यापैकी १६.७९ मीटर ही त्याची सर्वोत्तम उडीची कामगिरी अव्वल आठ क्रमांकांपैकी नव्हती. अव्वल आठ स्पर्धकांनाच आणखी तीन उडय़ा मारण्याची संधी मिळते. पात्रता फेरीत १६.६८ मीटर अंतरासह एकंदर १२वा क्रमांक गाठणारा पॉल हा तिहेरी उडीची अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय अ‍ॅथलेटिक्सपटू आहे. व्हिसा मिळण्यास दिरंगाई झाल्यामुळे तो अमेरिकेत उशिराने पोहोचला होता.

पुरुष रीले चमू अपयशी

४ बाय ४०० मीटर शर्यतीच्या पहिल्या शर्यतीत भारताच्या पुरुष रिले चमूला सहावे आणि अखेरचे (एकंदर १२वे) स्थान मिळाले. त्यामुळे पदकाची फेरी गाठण्यात त्यांना अपयश आले. मुहम्मद अनस याहिया, मुहम्मद अजमल यारियाथोडी, नागनाथन पंडी आणि राजेश रमेश या चौकडीने ३:०७.२९ अशी वेळ नोंदवली.

कडव्या स्पर्धकांसमवेत ही आव्हानात्मक स्पर्धा होती. वारा समोरच्या बाजूने जोराने वाहत होताा. त्यामुळे भाला फेकणे माझ्यासह सर्वानाच कठीण जात होते; परंतु चांगला प्रयत्न नक्कीच साकारेल, यावर माझा विश्वास होता. पहिल्या तीन प्रयत्नांत अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाही. चौथ्या प्रयत्नात मात्र दमदार पुनरागमन केले. देशासाठी रौप्यपदक जिंकू शकल्याचा अतिशय आनंद होतो आहे. जागतिक स्पर्धा ही ऑलिम्पिकपेक्षाही अवघड असते. 

– नीरज चोप्रा

जादूई क्षणाबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन. जागतिक पदकविजेत्यांच्या पंगतीत तुझे स्वागत आहे. बराच काळ यासाठी वाट पाहावी लागली. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचे त्यांच्या सहकार्यासाठी आभार.

– अंजू बॉबी जॉर्ज, माजी लांब उडीपटू 

नीरज चोप्राचे उत्कृष्ट यश! जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकल्याबद्दल नीरजचे अभिनंदन. भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी हा खास क्षण आहे. पुढील प्रवासासाठी नीरजला खूप शुभेच्छा.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन. तू कायमच आम्हाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करतोस. उर्वरित हंगामासाठी तुला शुभेच्छा.

– अभिनव बिंद्रा, माजी नेमबाज

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत आपल्या देशासाठी रौप्यपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन. तुझ्या सर्वोत्तम कामगिरीमुळे आपल्या देशाचा जगात गौरव झाला आहे. तिरंगा असाच उंच फडकवत राहा. जय हिंदू.

– पी. टी. उषा, माजी धावपटू    Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.