February 2, 2023
sp avinash sable

पीटीआय, युगेनी (अमेरिका) : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने अपेक्षेप्रमाणेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरी गाठली. दोहा येथे २०१९मध्ये झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या भारताच्या २७ वर्षीय साबळेने तिसऱ्या क्रमांकाच्या शर्यतीत ८:१८.७५ मिनिटे अशी वेळ नोंदवली. या स्पर्धेची अंतिम फेरी सोमवारी म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी होणार आहे.

स्पर्धेच्या अर्ध्या टप्प्यापर्यंत साबळे आघाडीवर होता. पण इथिओपियाचा हॅलेमारियम अमारे (८:१८.३४ मिनिटे) व अमेरिकेचा ईव्हा जॅगेर (८:१८.४४ मिनिटे) यांनी त्याला मागे टाकले. स्पर्धेच्या तीन शर्यतींमधील अव्वल तीन स्पर्धक आणि त्यानंतरचे सहा वेगवान धावपटू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. साबळेने जूनमध्ये प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवताना ८:१२.४८ मिनिटांचा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.

श्रीशंकरचा पराक्रम

मुरली श्रीशंकर हा जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला पुरुष लांब उडीपटू ठरला. यंदाच्या स्पर्धेत पदकाच्या आशा असलेल्या श्रीशंकरने दुसऱ्या प्रयत्नात आठ मीटर अंतराची सर्वोत्तम उडी घेतली. त्यामुळे त्याला ब-गटाच्या पात्रता फेरीत दुसऱ्या आणि एकंदर सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. लांब उडी प्रकारात अंजू बॉबी जॉर्जने जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठून भारताला पहिले पदक जिंकून दिले होते. २००३च्या पॅरिस जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवले होते. या अ‍ॅथलेटिक्स प्रकारात जेसविन एल्डरिन आणि अनीस याहिया यांना अनुक्रमे नवव्या आणि ११व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. जेसविनने ७.७९ मीटर आणि अनीसने ७.७३ मीटर अशी सर्वोत्तम उडी मारली. ८.१५ मीटर अंतर ओलांडणाऱ्या किंवा सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दोन्ही गटांतील १२ स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले. अंतिम फेरी भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी होणार आहे.

ताजिंदरची माघार

आशियाई विक्रमवीर गोळाफेकपटू ताजिंदरपाल सिंग तूरने मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे स्पर्धेतून माघार घेतली. चार दिवसांपूर्वीच अमेरिकेतून परतल्यावर त्याला ही दुखापत झाली होती. परंतु या स्पर्धेत उतरल्यानंतर काही काळ सराव केला. परंतु दुखापतीमुळे कठीण जात असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याने स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला.

संदीप, प्रियांकाची निराशा

पुरुष आणि महिलांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत अनुक्रमे संदीप कुमार आणि प्रियांका गोस्वामी यांनी निराशाजनक कामगिरी केली. दोन्ही राष्ट्रीय विक्रमवीर खेळाडूंनी आपल्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा खराब कामगिरी केली. संदीपने ४३ स्पर्धकांपैकी ४०वा, तर प्रियांकाने ३६ स्पर्धकांपैकी ३४वा क्रमांक मिळवला.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.