December 1, 2022
brad hogg on virat kholi

मुंबई : गेल्या काही वर्षांत नेतृत्व आणि तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळल्यामुळे दडपण वाढल्याने विराट कोहलीच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने व्यक्त केले.

‘‘कोहली हा मैदानावर अतिशय आक्रमक आणि मैदानाबाहेर विनम्र स्वभावाचा व्यक्ती आहे. कर्णधार म्हणूनही त्याने भारताला उत्तम यश मिळवून दिले आहे. परंतु तो सध्या धावांसाठी झगडत असल्यामुळे त्याच्याविषयी अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. पण तो भारताचा क्रिकेटदूत आहे. गेल्या एक-दोन वर्षांतील त्याची कामगिरी नक्कीच चिंताजनक आहे. परंतु दडपणामुळे त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला असेल,’’ असे हॉगने सांगितले. ‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. ऑस्ट्रेलियाने तसे घेतले आहेत,’’ असे तो म्हणाला. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया पर्यटन मंडळातर्फे आयोजित केलेल्या प्रचार कार्यक्रमात हॉगने पर्थमधील स्टेडियम व भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याविषयी अंदाज व्यक्त केले.

चहल यशस्वी ठरेल!

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात यजुर्वेद्र चहल यशस्वी ठरेल, असे हॉगने म्हटले आहे. ‘‘गेल्या एक-दोन वर्षांत चहलने सामन्याला कलाटणी देण्याचे तंत्र उत्तमपणे आत्मसात केले आहे. त्यामुळे विजेत्यांच्या शर्यतीत भारताला ग्राह्य धरताना चहल हे एक महत्त्वाचे कारण आहे,’’ असे हॉगने सांगितले.

सूर्यकुमारच्या फलंदाजीचे कौतुक

सूर्यकुमार यादव हा अतिशय धडाकेबाज फलंदाज आहे, अशा शब्दांत हॉगने त्याचे कौतुक केले. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात यादवने ५५ चेंडूंत ११७ धावांची वादळी खेळी साकारली. ‘‘सूर्यकुमारला गोलंदाजी करणे आव्हानात्मक असते, कारण त्याच्या भात्यात वेगळे फटके आहेत. तो आणि ऋषभ पंत लवकर बाद झाले तर भारताचा धावांचा वेग आटतो,’’ असे विश्लेषण हॉगने केले.

दक्षिण आफ्रिकेचा निर्णय निराशाजनक!

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या तीन एकदिवसीय मालिकेत न खेळण्याचा दक्षिण आफ्रिकेचा निर्णय निराशाजनक आहे, असे हॉगने सांगितले. ‘‘ही समस्या आफ्रिकेची आहे. एका ट्वेन्टी-२० लीगच्या आयोजनासाठी त्यांनी ही मालिका टाळण्याचा मार्ग स्वीकारला आहे,’’ असे हॉग म्हणाला.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.