December 5, 2022
kolhapur green

दयानंद लिपारे

कोल्हापूर : भारतीय शेतीत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या युरिया खताच्या फायद्यापेक्षा त्याचे पर्यावरण आणि आरोग्यविषयक दुष्परिणामच अधिक असल्याचे सतत सिद्ध होत असल्याने त्यावर उपाय म्हणून संशोधनाअंती आता नव्या स्वरूपातील ‘नॅनो युरिया’ हे द्रवरूप खत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. खताचा हा नवा प्रकार अगोदरच्या घन रूपातील खताच्या तुलनेत कृषी, आर्थिक, पर्यावरण, सामाजिक, आरोग्य या सर्वच क्षेत्रांत अधिक फायदेशीर असल्याचेही प्रायोगिक वापरानंतर दिसून आले आहे. केंद्र सरकारच्या वतीने आता खताचा या आगळय़ावेगळय़ा प्रकाराच्या वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यासही सुरुवात झाली आहे. 

भारतीय शेतीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमध्ये युरियाचा वापर सर्वाधिक होतो. सन २०२०-२१ मध्ये देशांमध्ये ६६१ लाख टन रासायनिक खतांची विक्री झाली. त्यामध्ये या एकटय़ा युरियाचा वाटा ३५० लाख टनांचा होता. या युरियाच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता खराब होणे, भूगर्भातील पाण्यावर अनिष्ट परिणाम होणे, हवेतील प्रदूषणात वाढ असे घातक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे या एवढय़ा मोठय़ा युरियाच्या पुरवठय़ासाठी त्याची आयातही करावी लागते. त्यासाठी केवळ गेल्या वर्षभरात एक अब्ज डॉलरहून अधिक परकीय चलन खर्च करावे लागले होते.

‘नॅनो युरिया’ म्हणजे काय?

‘नॅनो’ म्हणजे सूक्ष्म. आजवर वापरल्या जाणाऱ्या युरियाची कार्यक्षमता तेवढीच ठेवत त्याचे हे ‘नॅनो’ रूप संशोधनातून आकारास आले आहे. एरवी ४५ किलो वजनाच्या पोत्यात सामावले जाणारे युरिया इथे केवळ ५०० मिलीच्या ‘नॅनो युरिया’ बाटलीतून मिळणार आहे. याचा वापर अगदी अचूक असल्याने त्याचे शेती, जमीन, हवा, पाणी असे पर्यावरणावर दुष्परिणाम होत नाहीत. यासाठी येणारा खर्चही कमी आहे. या प्रकारचे खत देशांतर्गतच तयार होत असल्याने त्यावर होणारा परकीय चलनाच्या खर्चातही बचत होत आहे.

केंद्राचे प्रोत्साहन : या नव्या द्रवरूप खत वापरण्यासाठी केंद्र शासनानेही प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले आहे. यासाठी ‘इफको’ या ‘नॅनो युरिया’चे उत्पादन घेण्यास प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत ३.६ कोटी बाटल्यांचे उत्पादन केले असून त्यापैकी २.५ कोटी बाटल्या शेतकऱ्यांना विकल्याही गेल्या आहेत. हा प्रतिसाद आणि गरज लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा आणखी आठ प्रकल्पांच्या उभारणीची योजना तसेच ‘इफको’चे ‘नॅनो-युरिया’चे रोजचे उत्पादन १.५ लाख युरियाच्या बाटल्या तयार करण्यापर्यंत नेण्याचे जाहीर केले आहे.

फायदे काय? : सन २०१९-२० या कालावधीत या ‘नॅनो युरिया’च्या देशात ११ हजार ठिकाणी क्षेत्रीय चाचण्या घेण्यात आल्या. यानुसार शेती उत्पादनात सरासरी ८ टक्के तर शेतकऱ्यांच्या सरासरी उत्पन्नात २ हजार रुपये प्रति एकर वाढ झाली आहे. एकूण खत वापरात ५० टक्के बचत झाली तसेच यामुळे खत अनुदान, परकीय चलन यामध्ये मोठय़ा प्रमाणात बचत होणार आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.