December 1, 2022
sp bidyarani

पीटीआय, बर्मिगहॅम : भारताची वेटलिफ्टिंगपटू बिंद्याराणी देवीने महिलांच्या ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हे भारताचे चौथे पदक ठरले. मीराबाई चानूच्या सुवर्ण कामगिरीनंतर २३ वर्षीय बिंद्याराणीने एकूण २०२ किलो वजन उचलत रौप्यपदक जिंकले. क्लीन अँड जर्क प्रकारात ११६ किलो वजन उचलत राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. त्यापूर्वी स्नॅचमध्येही (८६ किलो) तिने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवली. या गटातील सुवर्णपदक नायजेरियाच्या अदिजात एडेनिके ओलारिनोयेने पटकावताना एकूण २०३ किलो (स्नॅचमध्ये ९२ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १११ किलो) वजन उचलले. इंग्लंडच्या फ्रेयर मॉरोला (१९८ किलो) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे माझे पहिलेच पदक आहे. त्यातही रौप्यपदक पटकावल्याबद्दल आणि विक्रमाची नोंद केल्याबद्दल मी खूप आनंदित आहे. मी २००८ ते २०१२ या कालावधीत तायक्वांदो हा क्रीडा प्रकार खेळत होते; परंतु माझी उंची वेटलिफ्टिंगसाठी योग्य असल्याचे अनेकांनी मला सांगितले. त्यामुळे मी या खेळाकडे वळले.

– बिंद्याराणी देवी

हॉकी

भारताकडून घानाचा धुव्वा

भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी ब-गटातील घानाचा ११-० अशा धुव्वा उडवत राष्ट्रकुल स्पर्धेला दिमाखात प्रारंभ केला. हरमनप्रीत सिंगने (११, ३५ आणि ५३वे मिनिट) तीन गोल झळकावत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर जुगराज सिंगने (२२, ४३वे मि.) दोन गोल केले. त्याचप्रमाणे अभिषेक (दुसरे मि.), शमशेर सिंग (१४वे मि.), आकाशदीप सिंग (२०वे मि.), नीलाकांत शर्मा (३८वे मि.), वरूण कुमार (३९वे मि.) आणि मनदीप सिंग (४८वे मि.) यांनी एकेक गोल केला.

भारताचा वेल्सवर विजय

वंदना कटारियाने झळकावलेल्या दोन गोलच्या बळावर भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिला हॉकीच्या अ-गटाच्या लढतीत वेल्सवर ३-१ असा विजय साकारला. भारताने आपले तिन्ही गोल पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने केले. वंदनाने २६ आणि ४८व्या मिनिटाला भारतासाठी दोन गोल केले. भारताचा अन्य गोल  गुरजित कौरने २८व्या मिनिटाला केला.

स्क्वॉश

जोश्ना चिनप्पा उपांत्यपूर्व फेरीत

बर्मिगहॅम : आघाडीची भारतीय स्क्वॉशपटू जोश्ना चिनप्पाने महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. १८ राष्ट्रीय जेतेपद मिळवणाऱ्या जोश्नाने न्यूझीलंडच्या कॅटलिन वॉट्सला ११-८, ९-११, ११-४, ११-६ अशा फरकाने पराभूत केले.  पुढील फेरीत तिचा सामना कॅनडाच्या होली नॉटनशी होईल.

  टेबल टेनिस

गतविजेत्या भारताचे आव्हान संपुष्टात

गतविजेत्या भारतीय महिला टेबल टेनिस संघाचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यांनी मलेशियाकडून २-३ अशी हार पत्करली. रिथ टेनिसन आणि श्रीजा अकुला जोडीला दुहेरीच्या लढतीत ७-११, ६-११, ११-५, ६-११ अशा पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर मनिका बत्राने यिंग हो हिला ११-८, ११-५, ८-११, ९-११, ११-३ अशा फरकाने नमवत सामना १-१ असा बरोबरीत आणला. अकुलाने अन्य लढतीत ली सिआन अलाइस चँगला ११-६, ११-६, ११-९ असे हरवत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, मनिकाने कारेन लायनकडून ६-११, ३-११, ९-११ अशी हार पत्करल्याने लढत पुन्हा बरोबरीत आली. निर्णायक एकेरीच्या सामन्यात यिंग हो हिने रिथ टेनिसनला १०-१२, ११-८, ६-११, ११-९, ११-९ असे पराभूत करत मलेशियाला विजय मिळवून दिला.

जलतरण

भारताचा जलतरणपटू श्रीहरि नटराजने पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोकची उपांत्य फेरी गाठली. नटराजने २५.५२ सेकंद वेळेसह उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली. नटराजने १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सातवे स्थान मिळवले.

जिम्नॅस्टिक्स

भारताचा जिम्नॅस्टिकपटू योगेश्वर सिंगने पुरुषांच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये १५वे स्थान मिळवले. हरयाणाच्या योगेश्वरने एकूण ७४.७०० गुण मिळवले. या स्पर्धेत इंग्लंडच्या जॅक जर्मनने ८३.४५० गुणांसह सुवर्ण कामगिरी केली. अंतिम फेरी गाठणारा योगेश्वर हा एकमेव भारतीय होता. सैफ तांबोळी आणि सत्यजित मोंडल यांना अंतिम फेरी गाठता आली नाही.

बॅडमिंटन

गतविजेत्या भारताच्या बॅडमिंटन संघाने मिश्र सांघिक विभागातील अ-गटात ऑस्ट्रेलियावर ३-० असा विजय साकारला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता किदम्बी श्रीकांत, दोन ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधू, तसेच बी. सुमित रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने आपापले सामने जिंकले.



Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.