December 5, 2022
Chess Olympiad 2022

चेन्नई : भारताच्या खुल्या आणि महिला विभागांतील सहाही संघांनी शुक्रवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताची अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने पहिल्याच दिवशी रोमहर्षक सरशी साधली.

खुल्या विभागातील दुसऱ्या मानांकित भारताच्या ‘अ’ संघाने ९४व्या मानांकित झिम्बाब्वेला ४-० अशी धूळ चारली. पहिल्या पटावर पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या विदित गुजराथीने मकोटो रॉडवेलला ४९ चालींमध्ये पराभूत केले. या लढतीत रॉडवेलने विदितला चांगली झुंज दिली. मात्र, अखेरच्या चालींमध्ये चमकदार कामगिरी करत विदितने विजय प्राप्त केला. प्रतिभावान युवा खेळाडू अर्जुन इरिगेसीने ऑफलाइन ऑलिम्पियाड स्पर्धेत पदार्पणात मसान्गो स्पेन्सरला ३८ चालींमध्ये नमवले. तसेच एसएल नारायणन आणि के. शशिकिरण यांनीही विजयारंभ करताना अनुक्रमे एमराल्ड मुशोरे आणि जेमुसे झेम्बा यांना पराभूत केले.

खुल्या विभागातील भारताच्या ‘ब’ आणि ‘क’ संघांनाही विजयी सुरुवात करण्यात यश आले. ‘ब’ संघाने संयुक्त अरब अमिराती, तर ‘क’ संघाने दक्षिण सुदान संघांचे आव्हान परतवून लावले. ‘ब’ संघातील डी. गुकेशला संघर्ष करावा लागला. मात्र, त्याने ४१ चालींमध्ये ओमरान अल होसानीवर मात केली. तत्पूर्वी, रौनक साधवानीने अल ताहेर अब्दुलरहमान मोहम्मदला नमवत ‘ब’ संघाचा सर्वात पहिला विजय नोंदवला होता. तसेच बी. अधिबननेही आपला सामना जिंकला. निहाल सरिनने इब्राहिम सुल्तानला ६२ चालींमध्ये पराभूत करण्याची कामगिरी केली. भारताच्या ‘क’ संघाकडून अभिजीत गुप्ता, मुरली कार्तिकेयन, एस. पी. सेतुरामन आणि अभिमन्यू पुराणिक यांनी विजय मिळवले.

महिला गटातील भारताच्या ‘अ’ संघाने ताजिकिस्तानचा पराभव केला. भारताची तारांकित खेळाडू कोनेरू हम्पीने पहिल्या पटावर ४१ चालींमध्ये नादेझदा अ‍ॅन्टोनोव्हानेवर सरशी साधली. या लढतीच्या सुरुवातीला हम्पीला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. मात्र, २४व्या चालीवर अ‍ॅन्टोनोव्हाने चूक केली आणि यानंतर हम्पीने तिला पुनरागमनाची संधी न देता विजयाची नोंद केली. आर. वैशाली आणि भक्ती कुलकर्णी यांनी अनुक्रमे सब्रिना अबरोरोव्हा आणि होटामी यांना पराभूत केले. तानिया सचदेवला रुखशोना सायदोव्हाने उत्तम प्रतिकार केला. मात्र, तानियाने १०३ चालींमध्ये सरशी साधत ‘अ’ संघाला ४-० असा विजय मिळवून दिला. द्रोणावल्ली हरिकाला या लढतीसाठी विश्रांती देण्यात आली.

तसेच महिला विभागातील भारताच्या ‘ब’ संघाने वेल्स, तर ‘क’ संघाने हॉंगकॉंगचा ४-० असा धुव्वा उडवला. भारताच्या ‘ब’ संघाकडून वंतिका अगरवाल, सौम्या स्वामीनाथन, मेरी अ‍ॅन गोम्स, आणि दिव्या देशमुख यांनी आपापले सामने जिंकले. ‘क’ संघाकडून इशा करवडे, साहिथी वर्षिनी, प्रत्युशा बोड्डा आणि पी. व्ही. नंधिधा यांनी विजय नोंदवले.

मान्यवरांकडून पहिली चाल

प्रथमच भारतात आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पियाडच्या पहिल्या फेरीतील निवडक लढतींमध्ये मान्यवरांना पहिली चाल खेळण्याचा मान देण्यात आला. विदित गुजराथीच्या पटावरील पहिली चाल भारताचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी खेळली. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष संजय कपूर यांनी कोनेरू हम्पीच्या पटावर पहिली चाल खेळली. यावेळी पाच वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद, ‘फिडे’चे अध्यक्ष अर्कादी द्वार्कोव्हिच आणि ऑलिम्पियाडचे संचालक भरत सिंह चौहान हेसुद्धा उपस्थित होते.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.