December 1, 2022
sp d gukesh

वृत्तसंस्था, चेन्नई : युवा ग्रँडमास्टर खेळाडूंचा समावेश असलेल्या भारताच्या खुल्या गटातील ‘ब’ संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील दमदार कामगिरी सुरू ठेवताना शनिवारी इस्टोनियावर ४-० अशी मात केली. तसेच भारताच्या अन्य पाच संघांनाही सलग दुसरा विजय मिळवण्यात यश आले. 

खुल्या गटातील भारत ‘ब’ संघाकडून डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद आणि रौनक साधवानी या १६ वर्षीय खेळाडूंसह अनुभवी बी. अधिबनने विजयांची नोंद केली. पहिल्या पटावर पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या गुकेशने इस्टोनियाच्या कल्ले कीकला ३९ चालींमध्ये पराभूत केले. तसेच संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या पहिल्या फेरीतील सामन्यासाठी विश्रांती देण्यात आलेल्या प्रज्ञानंदने दुसऱ्या फेरीत इस्टोनियाच्या किरील चुकेव्हिनवर ४१ चालींमध्ये सरशी साधली. अधिबनने ४१ चालींमध्ये अलेक्झांडर व्होलोदिनचा, तर साधवानीने ५९ चालींमध्ये आंद्रे शिशकोव्हचा पराभव केला.

खुल्या गटातील दुसऱ्या मानांकित भारताच्या ‘अ’ संघाने मोल्डोव्हाला नमवले. ‘अ’ संघाचा प्रमुख खेळाडू विदित गुजराथीला या लढतीसाठी विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी पहिल्या पटावर खेळणाऱ्या पी. हरिकृष्णाने इव्हान शित्कोला ३८ चालींमध्ये पराभूत केले. तसेच एसएल नारायणन आणि के. शशिकिरण यांनीही आपापले सामने जिंकले. अर्जुन इरिगेसीला मात्र आंद्रे माकोव्हेइने बरोबरीत रोखले. भारताच्या ‘क’ संघातील सूर्यशेखर गांगुली, एस. पी. सेतुरामन आणि अभिजित गुप्ता यांचे सामने बरोबरीत सुटले. मात्र, मुरली कार्तिकेयनने युरील कापोवर मिळवलेल्या निर्णायक विजयामुळे भारतीय ‘क’ संघाने या लढतीत बाजी मारली.

महिला विभागातील अग्रमानांकित भारताच्या ‘अ’ संघाने अर्जेटिनावर सरशी साधली. भारताची तारांकित खेळाडू कोनेरू हम्पीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मरिसा झुरीलने तिला बरोबरीत रोखले; परंतु आर. वैशालीने मारिया होसे कॅम्पोस, तानिया सचदेवने रोहास बोर्डा आणि भक्ती कुलकर्णीने मारिया बेलेन सक्र्विसला नमवल्यामुळे भारताने ही लढत जिंकली. भारताच्या ‘ब’ आणि ‘क’ संघाने अनुक्रमे लात्व्हिया आणि सिंगापूरवर मात केली. ‘ब’ संघाकडून वंतिका अगरवाल, सौम्या स्वामिनाथन आणि मेरी अ‍ॅन गोम्सने आपापले सामने जिंकले. पद्मिनी राऊतला इल्झे बेर्झिनाने बरोबरीत रोखले. ‘क’ संघाकडून इशा करवडे आणि पी. व्ही. नंधिधाने विजय नोंदवले, तर प्रत्युशा बोड्डा, विश्वा वस्नावाला यांचे सामने बरोबरीत सुटले.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.