December 5, 2022
chess olympiad

चेन्नई : युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशच्या सलग आठव्या विजयाच्या बळावर खुल्या विभागातील भारताच्या ‘ब’ संघाने शनिवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या आठव्या फेरीत अग्रमानांकित अमेरिकेला ३-१ असा पराभवाचा धक्का दिला.

भारत ‘ब’ संघाकडून पहिल्या पटावरील गुकेशने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या फॅबिआनो कारूआनाला ४५ चालींमध्ये पराभूत केले. नागपूरच्या रौनक साधवानीने लिनिएर डोिमगेजवर ४५ चालींमध्ये मात केली. तसेच निहाल सरिन आणि आर. प्रज्ञानंद यांनी अनुक्रमे लेव्हॉन अरोनियन आणि वेस्ली सो यांना बरोबरीत रोखत भारत ‘ब’ संघाच्या धक्कादायक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

याच विभागातील दुसऱ्या मानांकित भारताच्या ‘अ’ संघाने अर्मेनियाकडून १.५-२.५ अशा फरकाने हार पत्करली. पहिल्या पटावरील पी. हरिकृष्णाला गॅब्रिएल सर्गिसियनने चुरशीच्या लढतीत १०२ चालींमध्ये नमवले. विदित गुजराथी, अर्जुन इरिगेसी आणि एसएल नारायणन यांचे सामने बरोबरीत सुटल्याने भारताच्या ‘अ’ संघाचा पराभव झाला. भारताच्या ‘क’ संघाला पेरूने १-३ असे पराभूत केले.

महिला विभागात अग्रमानांकित भारताच्या ‘अ’ संघाला युक्रेनने २-२ असे बरोबरीत रोखले. कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका, आर. वैशाली आणि तानिया सचदेव या चौघींचेही सामने बरोबरीत संपले. भारताच्या ‘ब’ संघाने क्रोएशियावर ३.५-०.५ अशी मात केली. त्यांच्याकडून वंतिका अगरवाल, पद्मिनी राऊत आणि दिव्या देशमुख यांनी आपापले सामने जिंकले. भारताच्या ‘क’ संघाने मात्र पोलंडकडून १-३ असा पराभव पत्करला. त्यांच्या प्रत्युशा बोड्डा आणि पी. व्ही. नंधिधा पराभूत झाल्या.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.