November 27, 2022
Lovlina Borgohain

बर्मिगहॅम : माझ्या प्रशिक्षकांची सातत्याने छळवणूक होत असून यामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीच्या सरावात बरेच अडथळे निर्माण झाल्याचा आरोप ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोहेनने सोमवारी केला.

आर्यलडमधील सराव शिबीरानंतर राष्ट्रकुलसाठीचा भारतीय बॉक्सिंग चमू रविवारी रात्री बर्मिगहॅम येथील क्रीडा ग्राममध्ये दाखल झाला. मात्र, लवलिनाच्या वैयक्तिक प्रशिक्षिका संध्या गुरुंग यांच्याकडे प्रवेशपत्र नसल्याने त्यांना क्रीडा ग्राममध्ये प्रवेश देण्यात आला नाही. राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान अन्य वैयक्तिक प्रशिक्षक अमेय कोळेकर यांचेही मार्गदर्शन लाभावे अशी लवलिनाची इच्छा होती. मात्र, त्यांचेही नाव राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीच्या यादीत नव्हते. त्यामुळे लवलिनाने ‘ट्विटर’च्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला.

‘‘माझ्यासोबत सातत्याने छळवणूक होत आहे. ज्या प्रशिक्षकांमुळे मला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले, त्यांना आता बाजूला सारण्यात आले आहे. याचा माझ्या सरावावर परिणाम झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षिका संध्या गुरुंगजी यांच्यासह माझ्या प्रशिक्षकांचा राष्ट्रकुलसाठीच्या भारतीय पथकात समावेश करावा, अशी मी विनंती केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या सर्व गोष्टींमुळे माझी मानसिक छळवणूक होते आहे,’’ असे लवलिनाने ‘ट्विटर’वर लिहिले.

‘‘माझ्या प्रशिक्षिका संध्या गुरुंग या सध्या क्रीडा ग्रामबाहेर आहेत. माझ्या स्पर्धेला सुरू होण्यास केवळ आठ दिवस शिल्लक असून याचा माझ्या सरावाच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. माझ्या अन्य प्रशिक्षकांना भारतात परत पाठवण्यात आले आहे. या परिस्थितीत मी राष्ट्रकुल स्पर्धेवर कसे लक्ष केंद्रित करू शकेन?’’ असा सवालही लवलिनाने उपस्थित केला. अशाच प्रकारची वागणूक जागतिक स्पर्धेच्या वेळीही मिळाली होती, असा दावा लवलिनाने केला आहे.

लवलिनाच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (आयओए) या प्रकरणावर त्वरित तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत.

भारतीय बॉक्सिंग महासंघाकडून स्पष्टीकरण

लवलिनाने केलेल्या आरोपांनंतर भारतीय बॉक्सिंग महासंघाकडून (बीएफआय) स्पष्टीकरण देण्यात आले. ‘‘नियमानुसार एकूण खेळाडूंच्या तुलनेत केवळ ३३ टक्के साहाय्यक मार्गदर्शकांनाच भारतीय पथकासोबत जाण्याची परवानगी मिळते. राष्ट्रकुलसाठी भारताचा बॉक्सिंग चमू हा १२ जणांचा असून (आठ पुरुष आणि चार महिला) नियमानुसार चार साहाय्यकांना त्यांच्यासोबत जाता येऊ शकते. परंतु भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सहकार्यामुळे १२ बॉक्सिंपटूंसाठी चारऐवजी आठ साहाय्यक प्रशिक्षक देण्यात आले आहेत,’’ असे ‘बीएफआय’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.