December 5, 2022
Raghunandan Gokhale

रघुनंदन गोखले माजी बुद्धिबळपटू आणि प्रशिक्षक

यजमान भारताला बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील दोन्ही विभागांमध्ये पदक जिंकण्यात यश येणे, ही समाधानकारक बाब आहे. मात्र, त्यांना यापेक्षा अधिक चांगला निकाल नक्कीच मिळवता आला असता. यंदाच्या स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केली. परंतु अनुभवी आणि जागतिक क्रमवारीत वरच्या स्थानांवर असलेल्या खेळाडूंना अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. पी. हरिकृष्णा, विदित गुजराथी, कोनेरू हम्पी आणि द्रोणावल्ली हरिका यांच्या निराशाजनक कामगिरीचा भारतीय संघांना फटका बसला.

तसेच या स्पर्धेसाठी संघनिवड करताना भारताने पारंपरिक पद्धतीनुसार क्रमवारीला प्राधान्य दिले. त्यामुळे अव्वल पाच खेळाडू ‘अ’ संघात, त्यानंतरचे पाच खेळाडू ‘ब’ संघात अशा प्रकारे संघांची निवड करण्यात आली. मात्र, युवा खेळाडूंना एका संघात स्थान देत अनुभवी खेळाडूंचा एका संघात समावेश केला असता, तरी भारतीय संघ अधिक यशस्वी ठरू शकले असते. युवा अर्जुन इरिगेसीने खुल्या विभागातील भारतीय ‘अ’ संघासाठी चमकदार कामगिरी केली. परंतु त्याचा ‘ब’ संघात आणि अधिबनचा ‘ब’ऐवजी ‘अ’ संघात समावेश असता, तर दोन्ही संघांना पदके जिंकण्याची अधिक संधी मिळाली असती. महिला विभागातील भारताच्या ‘अ’ संघाने या संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. परंतु निर्णायक लढतीत त्यांना सर्वोत्तम खेळ करता आला नाही.

भारताच्या युवा खेळाडूंची या स्पर्धेतील कामगिरी वाखाणण्याजोगी होती. ते कोणतेही दडपण न घेता आणि निडरपणे खेळतात. हेच त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. डी. गुकेश, निहाल सरिन आणि आर. प्रज्ञानंद यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्याकडे आता भावी विश्वविजेते म्हणून पाहिले जात आहे. महिलांमध्ये आर. वैशाली, दिव्या देशमुख आणि वंतिका अगरवाल यांनी प्रभावित केले. भारतीय बुद्धिबळाच्या भविष्याच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे.(शब्दांकन : अन्वय सावंत)Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.