December 1, 2022
commonwealth games 2022

अ‍ॅथलेटिक्स  :
बर्मिगहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राचा अविनाश साबळे आणि प्रियंका गोस्वामी यांनी भारताच्या रौप्यपदकांमध्ये भर घातली. अविनाशने तीन हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात, तर प्रियंकाने १० हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत दुसरा क्रमांक मिळवला.

अविनाश आणि अब्राहम किबीवोट यांच्यात अखेरच्या टप्प्यापर्यंत कमालीची चुरस होती. केनियाच्या दोन धावपटूंना मागे टाकून अविनाशने किबीवोटला गाठले होते. अखेरच्या १०० मीटर अंतरावर मात्र किबीओटने वेग घेत साबळेला मागे टाकले. केवळ दशांश ५ सेकंदाच्या फरकाने अविनाशचे सुवर्णपदक हुकले. किबीवोटने ८ मिनिटे, ११.१५ सेकंद, तर अविनाशने ८ मिनिटे, ११.२० सेकंद अशी वेळ नोंदवली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अविनाशच्या रौप्यपदकाने केनियाच्या वर्चस्वाला शह बसला. राष्ट्रकुल स्पर्धेत तीन हजार मीटर स्टिपलचेस शर्यतीत १९९८पासून २०१८पर्यंत प्रत्येक स्पर्धेत पहिले तिन्ही क्रमांक केनियाच्या धावपटूंचे होते. या वर्षी प्रथमच हा क्रम चुकला. रौप्य भारताने मिळवले. पण कांस्यपदक केनियाचेच ठरले.

प्रियंकाने ४३ मिनिटे, ३८.८३ सेंकद अशी सरस वेळ नोंदवली. ऑस्ट्रेलियाची जेमिमा मोटांग (४२:३४.३०) सुवर्णपदकाची, तर केनियाची एमिली वामुसी (४३:५०.८६) कांस्यपदकाची मानकरी ठरली. भारताची दुसरी स्पर्धक भावना जाट ४७ मिनिटे, १४.१३ सेकंद अशी वेळ देत आठव्या स्थानावर राहिली.

चालण्याच्या शर्यतीत भारताने १२ वर्षांनी पदक मिळवले. यापूर्वी २०१०मध्ये सर्वप्रथम हरिमदर सिंगने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवले होते.

अविनाशकडून चार वर्षांत नवव्यांदा राष्ट्रीय विक्रम मोडीत

राष्ट्रीय विक्रम मोडणे फार कठीण नसते, हे आपले शब्द अविनाशने शनिवारी राष्ट्रकुल स्पर्धेतही खरे केले. त्याने गेल्या चार वर्षांत नवव्यांदा स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने सर्वप्रथम २०१८मध्ये भुवनेश्वर येथे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर यावर्षी मोरोक्कोमध्ये रबाक येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये अविनाशने ८ मिनिटे, १२.६८ सेकंद असा नवा विक्रम साकारला.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली महिला धावपटू ठरल्याच्या ऐतिहासिक कामगिरीचा मला अभिमान आहे. पदक जिंकण्याचे उद्दिष्ट तर होतेच, पण त्याबरोबरीने वेळ कशी सुधारेल, याकडे अधिक लक्ष दिले. वेळ सुधारल्यामुळे आनंद द्विगुणित झाला.  – प्रियांका गोस्वामी

सुरुवात उत्तम झाल्यानंतरही अखेरच्या टप्प्यामध्ये वेग वाढवण्यात अपयश आले. मी अधिक चांगला निकाल देऊ शकलो नाही. यानंतरही प्रदीर्घ कालावधीनंतर भारताला अ‍ॅथलेटिक्स प्रकारातील लांब पल्ल्याच्या शर्यतीत पदक मिळवून देऊ शकलो, याचा आनंद आहे. – अविनाश साबळे

बॉक्सिंग : जस्मिनला कांस्य

बॉक्सिंगमध्ये महिलांच्या ४८ किलो वजन गटात जस्मिन लंबोरिया कांस्यपदकाची मानकरी ठरली. भारताच्या २० वर्षीय जस्मिनला इंग्लंडच्या गेमा रिचर्डसनकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. या लढतीत रिचर्डसनचे आक्रमण आणि भक्कम बचाव निर्णायक ठरला.

जस्मिनने विद्यापीठ पातळीवर दोन सुवर्णपदके मिळविली असून, खेलो इंडिया युवा स्पर्धेतही जस्मिन सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जस्मिनने यापूर्वी डब्लिन येथील स्पर्धेत २०१९ मध्ये सुवर्ण, तर मंगोलिया येथे झालेल्या आशियाई युवा बॉिक्सग स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे.

अन्य लढतीत, भारताच्या जागतिक विजेत्या निकहत झरीनने ५० किलो वजनी गटातून अंतिम फेरी गाठताना यजमान इंग्लंडच्या अल्फिआ सवान्नाचा, तर. पुरुषांच्या ५१ किलो वजन गटात अमित पांघलने झांबियाच्या पॅट्रिक चिनयेम्बाचा आणि  महिलांच्या ४८ किलो वजन गटात नीतूने कॅनडाच्या प्रियांता धिल्लोनचा पराभव केला.

लॉन बॉल्स : भारताच्या पुरुष संघाला रौप्यपदक

राष्ट्रकुलमधील लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात शनिवारी भारताच्या पुरुष संघाला सोनेरी यशाने हुलकावणी दिली. स्पर्धेतील पुरुषांच्या सांघिक प्रकारातील अंतिम लढतीत भारताला नॉर्दन आर्यलडकडून ८-१५ असा पराभव पत्करावा लागला.

२०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या इंग्लंड संघाला हरवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र सुवर्ण लढतीत भारताला नॉर्दन आर्यलडचे आव्हान पेलवले नाही. प्रारंभीपासूनच नॉर्दन आर्यलडच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले होते. भारतीय खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधीच मिळाली नाही. भारतीय खेळाडू मुसंडी मारणार असे वाटत असताना अनेकदा नॉर्दन आर्यलडच्या खेळाडूंनी त्यांना निराश केले. भारताच्या पुरुष संघात सुनील बहादूर, नवनीत सिंग. चंदन कुमार सिंग आणि दिनेश कुमार यांचा समावेश होता.

त्यापूर्वी,  महिला दुहेरीत लवली चौबे आणि नयनमोनी सैकई जोडीचे आव्हान संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीत लवली-नयनमोनी जोडीला  इंग्लंडच्या सोफी टॉलचार्ड-अ‍ॅमी फारोह जोडीकडून १४-१८ असा पराभव पत्करावा लागला.

या पदकाने भारताची लॉन्स बॉल्स प्रकारातील मोहिमेची यशस्वी सांगता झाली. आतापर्यंत भारत लॉन्स बॉल्स क्रीडा प्रकारात पदकापर्यंतही पोहोचू शकला नव्हता. या वेळी भारताने प्रत्येकी एका सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली. भारतीय महिला संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता.

कुस्ती :  रवी, नवीन, विनेशला सुवर्ण

बर्मिगहॅम : भारताच्या कुस्तीगीरांनी शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी आपली ‘पदकमोहीम’ कायम राखली. विनेश फोगट (५३ किलो), रवी कुमार दहिया (५७ किलो) आणि नवीन (७४ किलो) या तिघांनी सुवर्णपदकांची कमाई केली.

मानसिक आणि शारीरिक समस्या दूर ठेवत विनेशने सलग तिसऱ्या राष्ट्रकुल सुवर्णपदकाला गवसणी घातली. अशी कामगिरी करणारी विनेश पहिलीच भारतीय महिला कुस्तीगीर ठरली. ऑलिम्पिक पदक विजेता रवी आणि विनेश दोघांनी अंतिम लढतीत प्रतिस्पर्ध्यावर निर्विवाद वर्चस्व राखले. रवीविरुद्ध नायजेरियाच्या एबीकेवेनीमो वेल्सनने चपळता दाखवली. पण, संधी मिळताच रवीने वेल्सनच्या पायाची पकड मिळवत भारंदाज डावावर सलग गुणांची कमाई करताना दो मिनिटे, १६ सेकंदांतच १०-० अशी आघाडी घेत सरस तांत्रिक गुणांच्या आधारे सुवर्णपदक पटकावले.

महिलांच्या ५३ किलो वजन गटाच्या लढती नॉर्डिक पद्धतीने झाल्या. अंतिम लढतीत विनेशने श्रीलंकेच्या चामोडय़ाकेशानी मदुरातलोला चीतपट केले. झोळी डावावर विनेशने कुस्ती धोकादायक स्थितीत नेली आणि त्याच स्थितीत मदुरातलोला चीतपट केले. पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटात नवीनने पाकिस्तानच्या मुहम्मद ताहिरचा गुणांवर ९-० असा पराभव केला.

दिव्या, मोहित, पूजाला कांस्यपदक

भारताच्या पदक मोहिमेत शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या कुस्तीच्या लढतींमध्ये दिव्या काक्रन आणि मोहित ग्रेवाल यांनी कांस्यपदके पटकावली. शनिवारी पूजानेही कांस्यपदक आपल्या नावे केले.

महिलांच्या ६८ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत दिव्या नायजेरियाच्या ओबोरुडुडूकडून पराभूत झाली होती. त्यानंतर रेपिचेजद्वारे दिव्याने कांस्यपदकाच्या लढतीत प्रवेश मिळवला. या लढतीत दिव्याने अवघ्या २६ सेकंदांत टोंगा देशाच्या टिगेर लिलीला चितपट करून कांस्यपदक मिळवले. मोहितने १२५ किलो वजनी गटात भारताला दुसरे कांस्यपदक मिळवून दिले. उपांत्य फेरीत कॅनडाच्या धरमवीर धेसीकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता.

मग रेपिचेजमध्ये मोहितने जमैकाच्या अ‍ॅरॉन जॉन्सनला दुसऱ्या फेरीत पट काढून खाली पाडले आणि तशाच स्थितीत अ‍ॅरॉनवर वर्चस्व राखून मोहितने चीतपटची संधी साधली. त्यामुळे त्याने कांस्यपदक आपल्या नावे केले. महिलांच्या ५० किलो वजन गटात पूजाने सरस तांत्रिक गुणांच्या आघाडीवर स्कॉटलंडच्या ख्रिस्तीनी लेचीजिओचा पराभव करून कांस्यपदक पटकावले.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.