December 1, 2022
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : लॉन बॉल्स : महिला संघाला सुवर्णपदक

बर्मिगहॅम : भारतीय महिला संघाने मंगळवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदकाची कमाई केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव केला.

भारतीय संघात लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सेलिना आणि रूपा राणी तिर्की यांचा समावेश होता. यात लवली चौबेने भारतीय संघाची आघाडी सांभाळली, त्यानंतर पिंकी, सेलिना आणि तिर्की यांनी आपले कौशल्य पणाला लावले. या क्रीडा प्रकारात एखाद्या भारतीय संघांने अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

सुवर्णपदकाच्या या लढतीत भारतीय महिला संघाने ८-२ अशी आघाडी घेतली होती. पण, दक्षिण आफ्रिकेच्या महिला खेळाडूंनी कमालीची चिवट झुंज देत सामन्याची स्थिती ८-८ अशी बरोबरीत राखली. थाबेलो मुहान्गो, ब्रिजेट कलिटझ, एस्मे क्रुगर आणि जोहान्ना स्निमन या चौघींचा दक्षिण आफ्रिका संघात समावेश होता.

भारतीय महिलांनी अखेरच्या तीन फेऱ्यात आपली कामगिरी उंचावली. या अखेच्या तीन फेऱ्यातील भारतीय महिलांची कामगिरी सोनेरी क्षणासाठी निर्णायक ठरली. दरम्यान, याच खेळातील तिहेरीतही भारतीय महिलांनी आपली आगेकूच कायम राखली. त्यांनी  पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा १५-११ असा पराभव केला.

वेटलिफ्टिंग : विकासला रौप्य :

विकास ठाकूर पुरुषांच्या ९६ किलो वजनी गटात बुधवारी रौप्यपदकाचा मानकरी ठरला. त्याने एकूण ३४६ किलो (१५५ किलो आणि १९१ किलो) वजन उचलले. विकासने सलग तिसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची कमाई केली. सामोआचा डॉन ओपेलॉज ३८१ किलो (१७१ आणि २१० किलो) सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

विकासचे हे दुसरे रौप्यपदक ठरले. यापूर्वी २०१४च्या ग्लासगो स्पर्धेत तो रौप्यपदक विजेता ठरला होता. गोल्ड कोस्ट येथील स्पर्धेत त्याने कांस्यपदक मिळवले होते. ‘‘सलग तिसऱ्या स्पर्धेत पदक जिंकल्याचा आपल्याला आनंद आहे. माझी आई आशा देवीला वाढदिवसाची भेट देऊ शकलो, यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला. मी हे पदक तिलाच अर्पण करतो,’’ अशी प्रतिक्रिया विकासने व्यक्त केली.

कारकीर्दीत पाचवेळा राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेचा पदक विजेता असलेल्या विकास हा स्नॅच प्रकारात अनुक्रमे १४९ किलो, १५३ किलो आणि १५५ किलो वजन उचलून संयुक्त तिसऱ्या स्थानावर होता. मग क्लिन अ‍ॅंड जर्क प्रकारात १८७ किलो वजन उचलून स्थान सुधारले. त्यानंतर विकासने १९८ किलो वजन उचलण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला.  

पूनमला अखेरचे स्थान

भारतीय वेटलििफ्टगपटू पूनम यादवला महिलांच्या ७६ किलो वजनी गटात शेवटच्या स्थानी समाधान मानावे लागले. स्नॅचमधील कामगिरीनंतर पूनम पदकाच्या शर्यतीत होती, मात्र क्लीन अँड जर्कमध्ये आपल्या तिन्ही प्रयत्नांत ती अपयशी ठरली. या वजनी गटात लेलरने सुवर्ण, नायजेरियाच्या तैवो लिआडीने रौप्य आणि नाराऊच्या मॅक्सिमिना उएपाने कांस्यपदक जिंकले.

पूनमवर वेटलिफ्टिंग संघटनेकडून ताशेरे

पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वेटलिफ्टिंगपटू पूनम यादववर भारतीय वेटलििफ्टग संघटनेचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी मंगळवारी ताशेरे ओढले. क्लीन अँड जर्कमधील तिन्ही प्रयत्नांत अपयशी ठरल्यामुळे पूनमला अपा़त्र ठरवण्यात आले होते. मागील राष्ट्रकुलमध्ये ६९ किलो गटात जेतेपद पटकावणारी पूनम स्नॅचमध्ये तिसऱ्या प्रयत्नात ९८ किलो वजन उचलत दुसऱ्या स्थानावर होती.

हरजिंदरला कांस्य

भारतीय वेटलििफ्टगपटू हरजिंदर कौरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ७१ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले.

सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार असलेल्या नायजेरियाच्या जॉय एझेचे क्लीन अँड जर्कमधील तिन्ही प्रयत्न अपयशी ठरल्याने हरजिंदरला कांस्यपदक मिळवता आले. इंग्लंडच्या साराह डेव्हिसने २२९ किलो वजन उचलत सुवर्णपदक जिंकले, तर कॅनडाच्या अ‍ॅलेक्सिज अ‍ॅशवर्थने २१४ किलो वजनासह रौप्यपदक मिळवले. हरजिंदरने एकूण २१२ किलो (स्नॅचमध्ये ९३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११९ किलो) वजन उचलले.

स्नॅचमधील पहिल्याच प्रयत्नात हरजिंदरला ९० किलो वजन उचलता आले नाही. मग दुसऱ्या प्रयत्नात ९० किलो वजन उचलत सर्वोत्तम कामगिरी केली. यानंतर तिसऱ्या प्रयत्नात ९३ किलो वजनासह आव्हान कायम ठेवले.

क्लीन अँड जर्कमध्ये हरजिंदरला ऑस्ट्रेलियाच्या किआना एलिअटने कांस्यपदकासाठी आव्हान दिले. हरजिंदरने आपली कामगिरी उंचावत पहिल्या प्रयत्नात ११३ किलो, नंतर ११६ किलो आणि तिसऱ्या प्रयत्नात ११९ किलो वजन उचलत कांस्यपदक पक्के केले.

टेबल टेनिस : भारताचे सांघिक सुवर्णयश

भारताच्या पुरुष संघाने टेबल टेनिस प्रकारात सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली. हरमित देसाई आणि जी. साथियन यांच्या सरस कामगिरीच्या जोरावर भारताने सिंगापूरचा ३-१ असा पराभव केला.

भारताचा प्रमुख खेळाडमू शरथ अंचता कमालला पराभव पत्करावा लागला, तरी त्याचा भारतीय संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. हरमित देसाई आणि जी. साथियन यांनी दुहेरीची पहिली लढत जिंकून भारताला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी सिंगापूरच्या योंग क्वेक-यू पांग जोडीचे आव्हान १३-११, ११-७, ११-५ असे परतवून लावले. त्यानंतर एकेरीच्या पहिल्याच लढतीत भारताच्या अंचता शरथ कमाल याला पराभवाचा सामना करावा लागला. सिंगापूरच्या हे यू क्लेरन्स च्यू याने त्याच्याविरुद्धची लढत चार गेममध्ये ११-७, १२-१४, ११-३, ११-९ अशी जिंकली.

सामन्यातील १-१ अशा बरोबरीनंतरही एकेरीत जी. साथियन आणि हरमित यांनी आपापल्या लढती जिंकताना अखेरची लढत खेळण्याची वेळच येऊ दिली नाही. जी. साथियनने आपली लय कायम राखताना यू एन कोएन पांगचा १२-१०, ७-११, ११-७, ११-४ असा पराभव केला. त्यानंतर हरमितने भारताच्या अंचता शरथला हरवणाऱ्या हे यु क्लेरन्स च्यू याचे आव्हान तीन गेममध्येच ११-८, ११-५, ११-६ असे सहज परतवून लावत भारताच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.