December 1, 2022
commonwealth games 2022

बर्मिगहॅम : ज्युडो : भारताची ज्युडोपटू तुलिका मानने राष्ट्रकुल स्पर्धेत सोनेरी यशासाठी सर्वस्व पणाला लावले. मात्र तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. स्कॉटलंडच्या सारा अडिलग्टनने ७८ किलो वजनी गटाच्या लढतीत तिचा पराभव केला.

तुलिकाने एकाच दिवसात दोन लढती जिंकताना अंतिम फेरी गाठली होती. या दोन्ही लढतीत तिने सर्वोत्तम खेळ केला होता. मात्र, अडिलग्टनविरुद्ध खेळताना तुलिकाला लय राखता आली नाही. अडिलग्टनने इप्पॉन डावावर तुलिकावर मात करत सुवर्णपदक पटकावले. अडिलग्टनने पूर्ण ताकदिने तुलिकाला उचलून मॅटवर खाली खेचले आणि लढत संपण्यास ३० सेकंद असताना विजयावर शिक्कामोर्तब केले.

तुलिकाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असले तरी तिची कामगिरी लक्षवेधी ठरली. या स्पर्धेतील भारताचे ज्युडो प्रकारातील हे तिसरे पदक ठरले. वयाच्या दुसऱ्याच वर्षी तुलिकाच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून आईनेच तुलिकाचा सांभाळ केला. तुलिकाने आईचे कष्ट वाया जाऊ दिले नाहीत. लढतीनंतर तुलिका कमालीची भावनाविवश झाली होती. त्यामुळे तुलिका लढतीनंतर प्रसारमाध्यमांसमोर बोलूच शकली नाही.

निर्णायक लढतीत मॅटवर खाली पडल्यावरच तुलिकाच्या डोळय़ांतून अश्रू वाहात होते. सुवर्णपदक हुकल्याची खंत तुलिकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होती. यंदाच्या स्पर्धेत सुशिला देवी व विजय कुमार यांनीदेखील रौप्यपदक मिळवले आहे. भारतीय खेळाडूंची ही कामगिरी नक्कीच प्रेरणादायी आहे. याच वर्षी एप्रिलमध्ये भारतीय ज्युडो संघटनेची मान्यता काढून घेण्यात आली होती.

मी येथे रौप्य नाही, तर सुवर्णपदक जिंकण्यासाठी आले होते. मी खूप निराश आहे. चार वर्षांनी पुन्हा सुवर्णपदकासाठी प्रयत्न करीन.

तुलिका मान

अ‍ॅथलेटिक्स : उंच उडीत तेजस्विनला कांस्य

राष्ट्रकुल संयोजन समितीने प्रवेशिका नाकारल्यानंतर अगदी अखेरच्या क्षणी सहभागास परवानगी मिळालेल्या भारताच्या तेजस्विन शंकरने राष्ट्रकुल स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील भारताचे पदकाचे खाते उघडले. त्याने उंच उडी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.

तेजस्विनने तिसऱ्या प्रयत्नात २.२२ मीटर उडी मारताना आपले पदक निश्चित केले. बहामासचा डोनाल्ड थॉमस आणि इंग्लंडचा जोएल क्लार्क यांनीही २.२२ मीटर उडी मारली होती. मात्र, त्याआधीच्या उडय़ा पूर्ण करण्यासाठी त्यांना तेजस्विनपेक्षा अधिक प्रयत्न करावे लागले होते. त्याने नंतर २.२५ मीटर उडीचा अयशस्वी प्रयत्न केला.

राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे. देशासाठी कांस्यपदक मिळवल्याचा मला अभिमान वाटतो. सुवर्णपदक विजेता हमिश केर आणि रौप्यपदक विजेता ब्रॅॅंडन स्टार्क यांच्यासह राष्ट्रकुलचे पदक स्वीकारणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण आहे. 

तेजस्विन शंकर

हॉकी : पुरुष संघाचा धडाका कायम

राष्ट्रकुल हॉकीत भारतीय पुरुष संघाने ब-गटातील तिसऱ्या विजयासह आपले आघाडीचे स्थान कायम राखले. भारताने गुरुवारी वेल्सचा ४-१ असा पराभव केला. हरमनप्रीतची हॅट्ट्रिक हे भारताच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. हरमनने पहिले दोन गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे साकारले, तर तिसरा गोल पेनल्टी स्ट्रोकद्वारे केला. भारताचा चौथा गोल गुरजंत सिंगने केला.

क्रिकेट : महिला संघ उपांत्य फेरीत

मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंगच्या भेदक माऱ्याच्या बळावर भारतीय महिला संघाने बुधवारी दुबळय़ा बार्बाडोसवर १०० धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटची उपांत्य फेरी गाठली.

प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित षटकांत ४ बाद १६२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात जेमिमा रॉड्रिग्जने ४६ चेंडूंत नाबाद ५६ धावांची खेळी साकारत महत्त्वाचे योगदान दिले. त्यानंतर रेणुकाने १० धावांत चार बळी घेत आघाडीच्या फळीला तंबूची वाट दाखवल्याने बार्बाडोसचा डाव ८ बाद ६२ धावांपर्यंत मर्यादित राहिला.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ४ बाद १६२ (जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद ५६, शफाली वर्मा ४६; शनिका ब्रूस १/१७) विजयी वि. बार्बाडोस : २० षटकांत ८ बाद ६२ (कायशोना नाइट १६; रेणुका सिंग ४/१०)

वेटलिफ्टिंग : गुरदीपला कांस्यपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघाच्या पदकांचा भार वेटलििफ्टग खेळाडू समर्थपणे पेलत आहेत. पुरुषांच्या १०८ किलोपेक्षा अधिक गटात गुरदीप सिंगने कांस्यपदकाची कमाई केली.

शेतकरी कुटुंबातील गुरदीपने १६७ किलो आणि २२३ किलो असे एकूण ३९० किलो वजन उचलून ही कामगिरी केली. गुरदीपने क्लीन अँड जर्क प्रकारात २२३ किलो वजन उचलताना आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. पाकिस्तानचा  नूह बट सुवर्ण, न्यूझीलंडचा डेव्हिड लीन रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

स्नॅचमध्ये पहिल्याच प्रयत्नात गुरदीप १६७ किलो वजन उचलू शकला नाही. दुसऱ्या प्रयत्नात गुरदीप यशस्वी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात तो १७३ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरला. क्लीन अँड जर्कची गुरदीपने २०७ किलो वजनाने सुरुवात केली. दुसऱ्या प्रयत्नात त्याचा २१५ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी आठ किलो वजन उचलण्याचे यशस्वी धाडस केले. तिसऱ्या प्रयत्नात त्याने २२३ किलो वजन उचलून पदक निश्चित केले.

अ‍ॅथलेटिक्स : हिमा उपांत्य, तर मंजू अंतिम फेरीत

धावपटू हिमा दासने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. हिमाने गुरुवारी पात्रता शर्यतीत २३.४२ सेकंद अशी वेळ दिली. एकूण सहा पात्रता शर्यतीनंतर अव्वल १६ धावपटू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये हिमासहब फेव्हर ऑफिली (२२.७१ सेकंद), एलिनी थॉमसन हेराह (२२.८० सेकंद) यांनीही सरस वेळ दिली. दरम्यान, भारताची मंजू बालाने ५९.६८ मीटर हातोडाफेक करत अंतिम फेरी गाठली. सरिता सिंग अपयशी ठरली.   

बॅडिमटन : सिंधू, श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत

भारताची आघाडीची बॅडिमटनपटू पीव्ही सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बॅडिमटन प्रकारात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने मालदीवच्या फातिमा नाबाहा अब्दुल रझाकवर २१ मिनिटांत २१-४, २१-११ असा सरळ गेममध्ये विजय मिळवला. याचप्रमाणे पुरुष एकेरीत श्रीकांतने युगांडाच्या डॅनियल वानागालियाला २१-९, २१-९ असे नामोहरम केले.

बॉक्सिंग : निकहतचे पदक निश्चित; लवलिना पराभूत

निकहत झरीन (५० किलो), नितू गंघास (४८ किलो), जस्मिन (६० किलो), अमित पंघाल (५१ किलो), मोहम्मद हुस्सामुद्दिन (५७ किलो), सागर अहलावत (९७+ किलो) यांनी उपांत्य फेरी गाठताना राष्ट्रकुल बॉक्सिंगमधील भारताची सहा पदके निश्चित केली. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या लवलिना बोरगोहेनला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत लवलिनाला गतवर्षीच्या रौप्यपदक विजेत्या रोसी एक्लेसने पराभूत केले. अमितने स्कॉटलंडच्या लेनन मुिलगनचा पराभव केला. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये अमितने रौप्यपदक जिंकले होते. जस्मिनने न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टनवर ४-१ असा विजय मिळवला. हरयाणाच्या २२ वर्षीय सागरने सेचेलीसच्या केड्डी ईव्हान्स एग्नीसला ५-० असे नामोहरम केले.

टेबल टेनिस ; मिश्र दुहेरीत आगेकूच

जी. साथियन-मनिका बत्रा आणि शरथ कमाल-श्रीजा अकुला या भारताच्या मिश्र दुहेरीतील जोडय़ांनी विजयी मोहीम कायम राखली. साथियन-मनिका जोडीने मिक क्रेआ-लॉरा सिनॉन जोडीचा ११-१, ११-३, ११-१ तर कमल-अकुला जोडीने ओवेन कॅथकार्ट-सोपी इअर्ली जोडीचा ११-७, ११-८, ११-९ असा फडशा पाडला.

स्क्वॉश : सुनयना-अनाहतची आगेकूच

भारताच्या सुनयना कुरुविला आणि अनाहत सिंग या युवा खेळाडूंच्या जोडीने स्क्वॉशमध्ये महिला दुहेरीत आगेकूच कायम राखली. सुनयना-अनाहत जोडीने सरळ दोन सेटमध्ये येहेनी कुरुप्पू-चानीथमा सिनली जोडीचा ११-९, ११-४ असा पराभव केला.

लॉन बॉल्स : मृदुल बोरगोहेन पराभूत

भारताचा मृदुल बोरगोहेन लॉन बॉल्सच्या पुरुष एकेरीच्या पाचव्या फेरीत जर्सीच्या रॉड डेव्हिसकडून पराभूत झाला. त्यामुळे त्याला उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही. बोरगोहेनने डेव्हिसकडून १३-२१ अशी हार पत्करली. सुरुवातीला बोरगोहेन हा ६-५ असा आघाडीवर होता, मात्र त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही.

पॅरा-वेटलिफ्टिंग : भारतीय खेळाडू अपयशी

पॅरा-वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला यश मिळाले नाही. महिला विभागात भारताच्या मनप्रीत कौरने पदकासाठी जरूर प्रयत्न केले. पण तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुष विभागात परमजीत कुमारला तिसऱ्या प्रयत्नात १६५ किलो वजन उचलण्यात अपयश आले आले. त्यामुळे परमजीतही पदकाच्या शर्यतीतून दूर राहिला.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.