
मुंबई : उपांत्य सामन्यात हरयाणासारख्या बलाढय़ संघाला आपल्या सोनेरी कामगिरीच्या बळावर नामोहरम करीत कबड्डीरसिकांची मने जिंकणाऱ्या महाराष्ट्राला ६९व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात महाराष्ट्राने भारतीय रेल्वेकडून २१-३८ असा पराभव पत्करला.
हरयाणातील चरखी दादरी येथील बंदिस्त क्रीडा संकुलात झालेल्या रेल्वेविरुद्धच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने उंचावलेल्या आत्मविश्वासानिशी खेळ केला. प्रारंभी पिछाडीवर पडल्यानंतर काही वेळातच ८-८ अशी बरोबरी साधली. आकाश शिंदे आणि अस्लम इनामदार या जोडगोळीच्या बहारदार चढायांना बचावाचीही तोलामोलाची साथ मिळत होती. पहिल्या सत्रात रेल्वेकडे
२०-१३ अशी आघाडी होती; परंतु दुसऱ्या सत्रात पवनने पहिल्याच चढाईत तीन आणि दुसऱ्या चढाईत दोन गुण घेत महाराष्ट्रावर लोण चढवत रेल्वेला २७-१३ अशी आघाडी मिळवून दिली. मग रेल्वेने वर्चस्वपूर्ण आणि कुशल रणनीतीने खेळ करीत महाराष्ट्राला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. अखेरीस १७ गुणांच्या फरकाने बाजी मारली.
महाराष्ट्राकडून अस्लमने चढायांचे ७ गुण (१ बोनस) तर आकाशने चढायांचे ४ गुण (१ बोनस) मिळवले. राहुल खाटीकने चढाईचा एक आणि पकडींचे दोन गुण मिळवले. संघनायक शंकर गदई, अक्रम शेख आणि मयूर कदम यांनी भक्कम बचावाचे प्रदर्शन केले. रेल्वेच्या विजयात पवन शेरावत (९ गुण), नितीन रावल (७ गुण) आणि विकास खंडोला (५ गुण) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.