November 27, 2022
cotten-2

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : सहकारी सूतगिरण्या आर्थिक अडचणीत सापडल्या असतानाही १७ कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळवल्याचा दावा करणाऱ्या चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीतील सत्ताधाऱ्यांना पराभवाला सामोरे जावे लागणे ही सहकारी सूतगिरण्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. तथापि यावरून एकूणच सहकारी सूतगिरण्यांचा नफा – तोटा नेमका किती यावरही मंथन होत आहे.

इचलकरंजी येथील श्री चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणी ही सूतगिरण्यांमध्ये दखलपात्र विषय नव्हती. तथापी त्यातील अर्थकारणाने इतरांचे लक्ष वेधून घेतले. निवडणूक आठ वर्षांनंतर संस्थेची निवडणूक झाली. या काळात सत्ताधारी गटाने सूतगिरणीचे विस्तारीकरण, मोठा नफा, दर फरक वितरण असे आकर्षक चित्र निर्माण केले. याच वेळी संचालक मंडळातील गटबाजी समोर आली होती. अध्यक्ष सुनील सांगले यांच्या कारभार मनमानी आहे असा ठपका ठेवून सहा संचालकांनी राजीनामा दिला. त्यांनी विरोधी आघाडीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन सत्ताधाऱ्यांची आकडेवारी कशी फसवी आहे याचा लेखाजोखा मांडला. यातून सूतगिरणीचे आर्थिक स्थितीवरून वादविवाद सुरू होऊन आव्हान – प्रतिआव्हान दिले गेले.

खेळ आकडय़ांचा

चौंडेश्वरी सूतगिरणीमध्ये १३ हजार चात्या सुरू होत्या. तेव्हा कर्जाचा बोजा नव्हता. विस्तारीकरण करण्यासाठी सत्ताधारी गटाने राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून ५३ कोटी रुपयांचे कर्ज आणि २७ कोटी रुपयांचे खेळते भांडवल घेतले. ८० कोटीचे कर्ज मिळवणे इतकी संस्थेने आर्थिक क्षमता प्राप्त केली असा दावा सांगले यांनी केला. वास्तव वेगळे असल्याचे विरोधक सांगतात. गिरणीच्या आर्थिक आकडेवारीची पाहणी केल्यानंतर रा. स. वि. महामंडळाने कर्ज वितरणाची रक्कम भरण्याचे सक्त सूचना सूतगिरणी व्यवस्थापनाला केली. परिणामी टेक्निकल अपग्रेशन फंडअंतर्गत उपलब्ध १३ कोटी आणि खेळते भांडवलाचे २७ असे ४० कोटी रुपये व्यवस्थापनाला परतफेड करणे भाग पडले. यात ४० कोटी रुपयांची कर्जफेड करू शकलो असा या अध्यक्षांच्या दाव्यात पोकळपणा असल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला.

नफ्याचे अर्थकारण अडचणीचे

जिल्ह्यातील हुतात्मा वारके या सूतगिरणीला आर्थिक व्यवस्थापनाचा वस्त्रोद्योग महासंघाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांचा नफा तीन कोटींच्या घरातील होता. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत १७ कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळवला असल्याचा दावा सांगले यांनी केल्यावर राज्यातील सहकारी सूतगिरणी संचालकांचे डोळे विस्फारले गेले. त्याधीच्या वर्षांत सूतगिरण्यांना आर्थिक वर्ष चांगले गेले होते. तरीही या गिरणीला सुमारे तीन कोटींचा तोटा कसा झाला असा प्रश्न सभासदांनी संचालक मंडळाला वार्षिक सभेत उपस्थित केला होता. तथापि, तीन कोटींचे नुकसान भरून काढून पुन्हा १७ कोटी रुपयांचा नफा मिळवल्या गेल्याचा दावा केल्याने यामध्ये काहीतरी गौडबंगाल असा सूर उमटत राहिला. विरोधी आघाडीने निवडणुकीत नफ्याची कथित आकडेवारी हाच चर्चेचा केंद्रिबदू बनवला. विठ्ठलराव डाके यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष सुनील सांगले यांच्या सत्ताधारी आघाडीने नफ्याचा आलेख मांडायला सुरू केला.त्यावर तो कसा फसवा आहे हे देवांग समाज अध्यक्ष विश्वनाथ मुसळे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडीने जोरदारपणे सांगितल्याने सत्ताधाऱ्यांची आकडेवारी पोकळ असल्याचे सभासदांच्या लक्षात येवून सभासदांनी सत्ताधारी गटाला पराभूत केले. १७ कोटीचा दिमाखदार नफा मिळवल्याचे दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना घरी बसायला लागणे ही सहकारी क्षेत्रातील विलक्षण परिस्थिती ठरली.

बिकट वाट नव्या संचालक मंडळाने कार्यकारी संचालक, लेखा परीक्षक यांच्याकडे चौकशी केली असता अद्याप ढोबळ नफा संदर्भातील कागदपत्रेच सादर झाली नसल्याचे सांगण्यात आले. प्रति चाती कर्ज योजनेचा आठ कोटी रुपयांचा बोजा सूतगिरणीवर आहे. कापसाचे १६ कोटी रुपये देय रक्कम आहे. १० कोटी रुपयांचे सूत शिल्लक असून त्याचे खालावत जाणारे दर पाहता त्यामध्ये सुमारे अडीच कोटी रुपये नुकसान संभवत आहे. रा. स. वि. महामंडळाचे मार्चपासूनचे दोन कोटी रुपयांचे हफ्ते थकीत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांचे आर्थिक दावे निखालस फसवे असल्याचे स्पष्ट झाले असून याबाबतचा सर्व व्यवहाराची श्वेतपत्रिका जाहीर केली जाणार असल्याचे नूतन संचालकांचे म्हणणे आहे. नव्याने सहकारी सूतगिरणी तयार करताना २५ हजार चात्यांसाठी ६५ कोटी रुपये खर्च झाल्याची उदाहरणे असताना गत सत्ताधाऱ्यांनी केवळ तेरा हजार चात्यांसाठी ८० कोटी रुपये कर्ज घेवून त्याचा विनियोग कसा केला गेला असाही प्रतिप्रश्न केला जात आहे.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.