December 1, 2022
EPL Football Rules

अन्वय सावंत

प्रीमियर लीग या जगातील सर्वांत लोकप्रिय व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेच्या नव्या हंगामाला प्रारंभ झाला असून शुक्रवारी (५ ऑगस्ट) झालेल्या सलामीच्या लढतीत आर्सेनलने क्रिस्टल पॅलेसवर २-० अशी मात केली. गेल्या हंगामात मँचेस्टर सिटीने सलग दुसऱ्यांदा आणि पाच वर्षांत चौथ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. मात्र, त्यांना लिव्हरपूलने कडवी झुंज दिली होती. यंदाही याच दोन संघांना जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. परंतु चेल्सी, टॉटनहॅम, आर्सेनल, मँचेस्टर युनायटेड हे संघ सिटी आणि लिव्हरपूलला आव्हान देण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे यंदाच्या हंगामाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यातच प्रीमियर लीगच्या काही नियमांमध्येही बदल करण्यात आल्याने सामने अधिक चुरशीचे होण्याची शक्यता बळावली आहे. हे नियम कोणते, याचा घेतलेला आढावा –

प्रीमियर लीगमधील सर्वांत महत्त्वाचा बदललेला नियम कोणता?

प्रीमियर लीगमधील सर्व (२०) संघांना नव्या हंगामातील प्रत्येक सामन्यात पाच बदली खेळाडू (सबस्टिट्यूट) मैदानात उतरवण्याची मुभा असेल. करोनाच्या पार्श्वभूमीवर, २०२०-२१ हंगामाच्या उत्तरार्धात पहिल्यांदा या नियमाचा अवलंब करण्यात आला होता. मात्र, हा नियम श्रीमंत अशा अव्वल सहा संघांसाठी (मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल, चेल्सी, टॉटनहॅम, आर्सेनल, मँचेस्टर युनायटेड) अधिक फायदेशीर ठरत असल्याची तक्रार अन्य काही संघांनी केली होती. त्यामुळे २०२१-२२च्या हंगामात हा नियम रद्द करून पुन्हा प्रति सामना केवळ तीन बदली खेळाडूंसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, अन्य देशांमधील फुटबॉल स्पर्धांमध्ये पाच बदली खेळाडूंचा नियम कायम ठेवण्यात आल्याने अखेर प्रीमियर लीगनेही नव्या हंगामासाठी हा नियम पुन्हा स्वीकारला आहे. परंतु संघांना एकूण पाच बदली खेळाडू मैदानात उतरवण्याची मुभा असली, तरी त्यांना त्यासाठी केवळ तीन संधी मिळतील.

‘मल्टि-बॉल’ सिस्टीम म्हणजे काय?

प्रीमियर लीगने नव्या हंगामासाठी ‘मल्टि-बॉल’ सिस्टीम आणली आहे. या नियमामुळे संघांकडून वाया घालवण्यात येणारा वेळ कमी होईल आणि सामने अधिक गतिमान होतील, अशी प्रीमियर लीगला आशा आहे. गेल्या हंगामात प्रीमियर लीगच्या सामन्यांमध्ये चेंडू ९० पैकी केवळ सरासरी ५५.०७ मिनिटे मैदानावर होता. म्हणजेच, उर्वरित वेळेत चेंडू रेषेबाहेर गेल्याने, खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने किंवा अन्य कारणांस्तव खेळ थांबलेला असायचा. यावर तोडगा म्हणून प्रीमियर लीगने ‘मल्टि-बॉल’ सिस्टीम आणली आहे. या नियमानुसार, एका चेंडूने सामना खेळला जात असेल, अन्य एक चेंडू चौथ्या पंचांकडे असेल आणि मैदानाच्या चारही दिशांना असलेल्या सीमारेषेबाहेर विविध ठिकाणी आठ चेंडू ठेवलेले असतील. त्यामुळे ज्या चेंडूने सामना खेळला जात आहे, तो चेंडू रेषेबाहेर गेल्यास अन्य एका चेंडूने पुन्हा त्वरित खेळाला सुरुवात करता येऊ शकेल.

पेनल्टीच्या नियमात काय बदल करण्यात आला आहे?

पेनल्टीसाठीच्या नियमानुसार, पेनल्टी घेणारा खेळाडू जोपर्यंत चेंडूला किक मारत नाही, तोपर्यंत गोलरक्षकाचा किमान एक पाय गोलरेषेच्या मागे किंवा वर असणे बंधनकारक आहे. गोलरक्षकाकडून या नियमाचे उल्लंघन झाल्यास प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा पेनल्टी मारण्याची संधी मिळेल.

अन्य कोणत्या नियमांमध्ये बदल झाला आहे?

पेनल्टी बॉक्समध्ये केवळ गोलरक्षकालाच चेंडूला हात लावण्याची मुभा असल्याचे आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना मंडळाने (आयएफएबी) स्पष्ट केले आहे. तसेच सामन्यापूर्वी नाणेफेक केवळ पंचांकडून करण्यात येईल, हेसुद्धा ‘आयएफएबी’ने अधोरेखित केले आहे. या नाणेफेकीच्या आधारे कोणत्या संघाकडे प्रथम चेंडू असणार आणि हा संघ कोणत्या दिशेला आक्रमण करणार हे ठरते.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.