November 27, 2022
sanjay-raut-on-sambhaji-raje-chhatrapati

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली असली तरी आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे. ही उमेदवारी देण्यासाठी आम्ही संभाजीराजेंकडे आमची भूमिका स्पष्ट शब्दांत मांडलेली होती. त्यामुळे फसवण्याचा प्रश्नच नसल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. दरम्यान संभाजीराजे यांच्या चुकलेल्या उमेदवारीला दुर्दैवी म्हणणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका करताना राऊत म्हणाले, की त्यांना असे वाटत असेल तर काँग्रेसने संभाजीराजेंना उमेदवारी देत निवडून आणावे.

संभाजीराजे छत्रपती यांनी काल पत्रकार परिषद घेत आपल्या माघारीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत त्यांनी शब्द पाळला नसल्याची टीका केली आहे. त्यांच्या या उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर राऊत आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. या वेळी पत्रकार परिषद घेत या सर्व प्रकरणावर त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आम्ही संभाजीराजे यांची उमेदवारी रद्द केली नाही तर त्यांना आमची भूमिका न पटल्याने ही उमेदवारी बाजूला पडली आहे असे सांगत राऊत म्हणाले की, ही उमेदवारी देण्यापूर्वी पक्षाने त्यांना काही गोष्टींची स्पष्ट कल्पना दिलेली होती. हा विषय महाविकास आघाडी, शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील आहे. यावरून त्यांची कुणी फसवणूक करण्याचा प्रश्नच नाही. राजे महाराजे यांना राजकारणात करियर करायचं असेल तर त्यांनाही कोणत्या तरी एका पक्षाबरोबर निष्ठेने राहावे लागते, असा टोलाही त्यांनी संभाजीराजे यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान या रद्द झालेल्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीवर छत्रपती घराण्याचा अपमान केल्याची टीका करणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावरही त्यांनी या वेळी टीका केली. दरम्यान यावरून महाविकास आघाडी आणि छत्रपती घराणे, मराठा समाज अशी दरी निर्माण केली जात असल्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, हा शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील विषय आहे. त्यांना उमेदवारी का दिली नाही याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. मात्र यातून सुरू झालेल्या विविध मतमतांतरांचा फायदा घेत भाजपने राजकारण करू नये.

संभाजीराजेंचे निर्णय व्यक्तिगत; श्रीमंत शाहू महाराजांचे स्पष्टीकरण

संभाजीराजे छत्रपती हे राजकारणात घेत असलेले सर्व निर्णय हे त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. तरीही ते अशाप्रकारे चुकीचा संबंध जोडत असतील तर ते चुकीचे असल्याचा निर्वाळा श्रीमंत शाहू महाराज यांनी येथे बोलताना दिला. तसेच शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात काही मुद्दय़ावर राज्यसभेच्या उमेदवारीबाबत ठरले होते. यातूनच ही उमेदवारी काही कारणांनी ते देऊ शकले नसतील तर त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द न पाळल्याची टीका होणेदेखील चुकीचे असल्याचे मत शाहू महाराजांनी व्यक्त केले.

सत्यच बोललो – संभाजीराजेंचा पवित्रा

राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीवरून श्रीमंत शाहू महाराज यांचे विधान चर्चेत असताना संभाजीराजे छत्रपती यांनी यावर समाज माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवताना ‘ मी सत्यच बोललो आहे’  असे म्हणत आपले विधान खरे असल्याचा दावा केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही असा आरोप केला होता. त्यावर श्रीमंत शाहू महाराज यांनी राज्यसभा निवडणूक लढवणे हा संभाजीराजेंचा व्यक्तिगत निर्णय होता. त्यात छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा मुद्दा येत नाही, अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. या वर संभाजीराजे यांनी  ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.