February 4, 2023
हरयाणाला त्यांच्या भूमीवर हरवल्याचा अभिमान! ; उपविजेत्या महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रशांत चव्हाण यांचे प्रतिपादन

मुंबई : वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या गेल्या १८-२० वर्षांच्या इतिहासात महाराष्ट्राने हरयाणाला पराभूत केले नव्हते. पण रविवारी उपांत्य फेरीत बलाढय़ हरयाणाला त्यांच्या भूमीवर हरवू शकलो, याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया उपविजेत्या महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रशांत चव्हाण यांनी व्यक्त केली.

भारतीय रेल्वेकडून अंतिम फेरीत २१-३८ असा पराभव पत्करल्यामुळे महाराष्ट्राचे जेतेपद हुकले. पण हरयाणावर मिळवलेल्या ३३-२७ अशा विजयामुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय स्पर्धेत दरारा निर्माण केला. या सामन्याबाबत चव्हाण म्हणाले, ‘‘हरयाणाच्या संघातील सर्वच १२ खेळाडू प्रो कबड्डी गाजवणारे होते, तर महाराष्ट्राच्या संघातील फक्त अस्लम इनामदार आणि आकाश शिंदे यांनाच एक-दोन वर्षांचा अनुभव होता. त्यामुळे हरयाणा महाराष्ट्राला आणि नंतर रेल्वेला हरवून जेतेपद जिंकणार, असा जाणकारांचा अंदाज होता. पण सामर्थ्यशाली हरयाणाचे या स्पर्धेतील आधीचे सामने तसेच यू-टय़ूबवरील चित्रफिती पाहून प्रदीप नरवाल, संदीप नरवाल यांच्या खेळाचा व्यवस्थित अभ्यास आम्ही केला होता. बोनस गेले तरी चालतील, पण क्षेत्ररक्षण भक्कम राहिले पाहिजे, हीच रणनीती होती. त्यामुळे हरयाणाला त्यांच्या भूमीवर हरवू शकलो.’’

चव्हाण यांनी उपविजेतेपदाचे श्रेय संपूर्ण संघाला दिले, तसेच तंदुरुस्ती तज्ज्ञ पुरुषोत्तम प्रभू, व्यवस्थापक अयूब पठाण यांचेही महत्त्वाचे योगदान होते, असे सांगितले. ‘‘राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळायचे तर अधिकाधिक तंदुरुस्तीची गरज असते. नव्या दमाच्या खेळाडूंचा संघ निवड समितीने दिला. या खेळाडूंनी शिबिरातही उत्तम मेहनत घेतली,’’ असे चव्हाण यांनी सांगितले.

रेल्वेविरुद्धच्या अंतिम सामन्यातील पराभवाचे विश्लेषण करताना चव्हाण म्हणाले, ‘‘रेल्वेविरुद्ध आपला अनुभव आणि व्यावसायिकता कमी पडली. रेल्वेमधील संपूर्ण संघ महाराष्ट्रापेक्षा सरस ठरला. त्यांचे दीड महिना शिबीर चालले, तर महाराष्ट्राचा फक्त १५ दिवस होता. महाराष्ट्राचे शिबीर अधिक दिवस आयोजित केले असते तर, त्याचे आणखी चांगले परिणाम दिसून आले असते.’’

आकाश-अस्लमचे कौतुक

आकाश-अस्लम यांनी चित्त्याप्रमाणे चढाया केल्या. या दोघांच्याही खेळात नजाकत आहे. आकाशने मेहनतीचे सातत्य कायम राखले, तर त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे, अशा शब्दांत चव्हाण यांनी या जोडगोळीचे कौतुक केले. ‘‘महाराष्ट्राच्या अननुभवी बचावपटूंनीही निर्धास्तपणे खेळ केला. प्रदीप, संदीप किंवा पवन शेरावत यांच्यासारख्या खेळाडूंच्या त्यांनी कौशल्याने पकडी केल्या,’’ असे चव्हाण या वेळी म्हणाले.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.