November 27, 2022
Emotional Sakshi Malik

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. शुक्रवारचा (५ ऑगस्ट) दिवस भारतीय कुस्तीगीरांनी गाजवला. त्यांनी भारताच्या पदकसंख्येत चार पदकांची मोलाची भर घातली. ऑलिंपिक पदक विजेत्या बजरंग पुनिया(६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो) आणि साक्षी मलिक (६२ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले तर, अंशु मलिकला (५७ किलो) रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. साक्षी मलिकने आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखून सुवर्णपदक जिंकले. मात्र, पदक जिंकूनही तिला मैदानातच अश्रू अनावर झाले.

भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने अंतिम फेरीत कॅनडाच्या अना गोंडिनेझ गोन्झालेसचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. साक्षी मलिकला जेव्हा सुवर्णपदक दिले जात होते, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. जेव्हा साक्षी व्यासपीठावर पोहोचली आणि तिने राष्ट्रगीत सुरू असताना समोर तिरंगा पाहिला. त्यावेळी ती खूप भावूक दिसली.

साक्षी मलिकने विजयानंतर सांगितले की, ‘मी येथे माझे सर्वोत्तम प्रदर्शन केले. सुरुवातीला ४-०ने पिछाडीवर पडूनही मी माझा आत्मविश्वास गमावला नाही. मागे पडल्यानंतर मी आक्रमक खेळ केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळाल्यानंतर मी खूप आनंदी आहे.’

राष्ट्रकुल स्पर्धेतील साक्षीचे हे पहिले सुवर्णपदक आहे. यापूर्वी तिने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदके जिंकली आहेत. ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकने आपल्या कौशल्याच्या जोरावर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरी जिंकली होती.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.