December 1, 2022
Indian mens hockey team

इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये २२वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये २८ जुलैपासून सुरू झालेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून भारतीय पुरुष हॉकी संघाने शेवट गोड केला आहे. भारतीय हॉकी संघाने रौप्य पदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७-० अशा फरकाने पराभव केला.

पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला त्यामुळे भारताचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. सामन्यात सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचे दोन पेनल्टी कॉर्नर उधळण्यात भारतीय बचावपटूंना यश आले. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात ऑस्ट्रेलियाने गोल केला. ब्लॅक गोवर्सने नवव्या आणि नॅथन इफार्मसने १४व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडीवर ठेवले.

त्यानंतर जेकब अँडरसनने २२व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत ऑस्ट्रेलियाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. टॉम विकहॅमने आणि अँडरसनने आणखी दोन गोल करून त्यात भर घातली. भारतीय खेळाडूंनी आजच्या सामन्यात बचावामध्ये अनेक चुका केल्या. याच कारणामुळे ऑस्ट्रेलियाला भरपूर पेनल्टी कॉर्नर मिळाले आहेत.

भारतीय पुरुष हॉकी संघ २०१०मधील दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०१४ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. तेव्हा सुवर्णपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत जबरदस्त खेळ दाखवला होता. या स्पर्धेत हा संघ आतापर्यंत अपराजित राहिला होता.

हेही वाचा – CWG 2022: ४०वर्षीय अचंताचा राष्ट्रकुल स्पर्धेत ‘जलवा’; सुवर्ण पदक पटकावून केला शेवट गोड

भारतीय संघ आजच्या सामन्यात १७ खेळाडूंसह उतरला होता. १७ खेळाडू रोटेशन पद्धतीने मैदानात आले होते. भारताचा मिडफिल्डर विवेक सागर प्रसाद जखमी असल्याने तो सामना खेळू शकला नाही. भारतीय संघ उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा ३-२ असा पराभव करून तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.

पहिल्या सामन्यात भारताने घानाचा ११-० असा पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात संघाने इंग्लंडविरुद्ध ४-४ अशी बरोबरी साधली होती तर, वेल्सविरुद्धचा तिसरा सामना ४-१ असा जिंकला होता.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.