December 5, 2022
dhananjay mahadik victory in rajya sabha elections give strengthens to bjp in kolhapur zws 70 | महाडिक यांच्या खासदारकीमुळे कोल्हापुरात भाजपला बळ

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची पाटी कोरी, अशी नेहमी टीका केली जात होती. भाजपची सारी मदार ही महाडिक कुटुंबीयावर , पण त्यांनाच लागोपाठ पराभवाचे धक्के बसत गेले. राज्यसभा निवडणुकीतील धनंजय महाडिक यांच्या विजयामुळे भाजप आणि चंद्रकांतदादांना खऱ्या अर्थी कोल्हापूरमध्ये बळ मिळाले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा तुल्यबळ सामना आगामी महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बघायला मिळेल.

कोल्हापूर जिल्ह्यात प्रबळ राजकीय गट म्हणून महाडिक गटाची ओळख होती. अगदी चार-पाच वर्षांपूर्वी या कुटुंबात खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी राजकीय महत्त्वाची पदे आणि गोकुळसारख्या महत्त्वाच्या संस्थेवर वर्चस्व होते. नंतरच्या काळात त्यास उतरती कळा लागली. धनंजय महाडिक यांनी संसदेत जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. त्यात काही वेळा यश आले तर अनेकदा यशाने हुलकावणी दिली. सन २०१४ सालच्या पहिल्याच निवडणुकीत ते सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून पराभूत झाले. पुढच्या निवडणुकीत त्यांनी लोकसभेऐवजी विधानसभेचा मार्ग धरला. याही निवडणुकीत ते सतेज पाटील यांच्याकडून पराभूत झाले. नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मोदी लाटेतही ते संसदेत पोहोचू शकले. खासदार म्हणून त्यांची कामगिरीही प्रभावी झाली. विकासकामांवरही भर होता. लोकसंपर्क चांगला होता. दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला होता. मात्र जिल्ह्यातील नेत्यांशी त्यांचे बिनसले. मागील लोकसभा निवडणुकीवेळी सतेज पाटील यांनी  आमचं ठरलंय  हे घोषवाक्य घेऊन शिवसेनेचे संजय मंडलिक यांना पाठबळ देऊन निवडून आणले. तेव्हा महाडिक यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर वर्षभराने महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दोन वर्षांच्या अंतरानंतर आता ते राज्यसभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संसदेत पोहोचले आहेत.

संघर्ष वाढणार..

ताज्या विजयामुळे धनंजय महाडिक यांच्यासह महाडिक गटालाही उभारी मिळाली आहे. महाडिक गटाचा जिल्ह्यातील राजकीय आणि संस्थात्मक गटावर प्रभाव होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक, विधानसभा निवडणुकीत अमल महादेवराव महाडिक हे पराभूत झाले. शौमिका अमल महाडिक यांची मुदत संपल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गेले. अलीकडे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत महाडिक यांचे भाचे सत्यजित कदम यांचा पराभव झाल्याने महाडिक गटाची पीछेहाट झाली तर सतेज पाटील यांची सरशी झाली. अशातच गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक येथे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या दुकलीने प्रभाव निर्माण केला. परिणामी महाडिक गटाला नमते घ्यावे लागले होते. धनंजय महाडिक यांच्यासह त्यांच्या गटाने भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी राज्यसभेच्या विजयामुळे महाडिक गटाची ताकद वाढली आहे.

आघाडी विरुद्ध भाजप सामना

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दोन्ही जागांवर पराभव झाला होता. राज्यसभा निवडणुकीतील विजयामुळे चंद्रकांतदादा पाटील यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय प्रभाव वाढीस लागणार आहे. खासदार धनंजय महाडिक अपक्ष आमदार विनय कोरे व प्रकाश आवाडे यांच्या सोबतीने ते लोकसभा, विधानसभा या निवडणुकीची भक्कम पायाभरणी सुरू करतील. कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणूक येथेही कमळ फुलवण्यासाठी त्यांची व्यूहरचना दिसत आहे. आगामी काळात महा विकास आघाडी विरुद्ध भाजप असा तोडीस तोड राजकीय सामना पाहायला मिळणार आहे.

शिवसेनेला धक्का

गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेची पीछेहाट झाली. त्यांचे सहापैकी पाच आमदार पराभूत झाले. राज्यसभा निवडणुकीत संजय पवार विजय झाले असते तर शिवसेनेला बळ मिळेल अशी अपेक्षा होती. पवार हे पराभूत झाल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थात शिवसेनेला आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसत आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.