December 1, 2022
eknath shinde

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा कोल्हापूर दौरा झाल्यानंतर त्यांना शिवसेनेतून प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत दिसून आले आहेत. माजी आमदार शिंदे -भाजपशी जवळीक वाढवत असल्याचे दिसत आहे. यामुळे कोल्हापुरातील शिवसेनेला तिसरा हादरा मिळण्याची चिन्हे दिसू लागली असून सेना आणखी कमकुवत होत चालली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात नऊ वर्षांपूर्वी शिवसेनेचे प्राबल्य होते. जिल्ह्यात एक-दोन आमदार निवडून येत असताना ही संख्या २०१४ सालच्या निवडणुकीत सहावर गेली होती. पण, गेल्या विधानसभा निवडणुकीत ती एकवर घसरली. त्यास भाजप- जनसुराज्य यांची छुपी आघाडी, शिवसेना उमेदवार आणि स्थानिक पदाधिकारी, जिल्हाप्रमुख यांच्यातील वाद कारणीभूत ठरला होता. पराभूत आमदारांनी पक्षविरोधी कारवायाविरोधात वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल पक्षाने घेण्याऐवजी कानाडोळा केला. याची खदखद लपून राहिली नव्हती.

एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा घेतल्यानंतर शिवसेनेतून होणाऱ्या अन्यायावर जिल्ह्यातूनही बोलले जाऊ लागले. यातूनच पहिल्या टप्प्यात माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर ,आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिंदे यांना समर्थन दिले. हा कोल्हापुरातील शिवसेनेला पहिला धक्का होता. पाठोपाठ कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनीही शिंदे गटाच्या छावणीत जाणे पसंत केले. ही घटना शिवसेनेला दुसरा मोठा धक्का देणारी होती.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आईचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात आले होते. हा अराजकीय दौरा होता. मात्र त्यातील काही घटना नव्याने होत असलेली राजकीय सलगी दर्शवणारे होत्या. शिवसेनेच्या चार माजी आमदारांची भूमिका तळय़ात मळय़ात राहिली आहे. डॉ. सुजित मिणचेकर व चंद्रदीप नरके हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात ठळकपणे दिसले. या सहभागाबद्दल त्यांनी राजशिष्टाचाराचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांसमवेत असल्याचे माध्यमांना सांगितले. ज्या दिवशी मुख्यमंत्री कोल्हापुरात आले होते. त्याच दिवशी कोल्हापुरात शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला होता. त्याकडे चारही माजी आमदारांनी पाठ फिरवली होती. शिवसेनेला तिसरा धक्का शिंदे -फडणवीस यांनी राज्यात कारभार सुरू केल्यापासून ही युती राजकीय पटलावर भक्कम दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याशी जमवून घेणे हे निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीने सोपे असल्याची भावना शिवसेनेतील नाराजांमध्ये दिसत आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात भाजपकडे तूर्तास सक्षम उमेदवार नाही. यामुळे भाजपशी त्यामुळे शिंदे -भाजप यांच्याशी जवळीक साधली तर या मतदारसंघाची उमेदवारी मिणचेकर यांच्याकडे जाऊ शकते. अशीच परिस्थिती करवीरमध्ये ही आहे. येथेही शिंदे -भाजप यांच्याकडे प्रबळ उमेदवाराची वानवा आहे. ही कसर चंद्रदीप नरके यांच्यामुळे भरून निघू शकते. याच विचारातून मिणचेकर- नरके यांची शिंदे -भाजप सरकारशी सलगी वाढत असताना दिसत आहे. यापूर्वी शिवसैनिकांनी आपण ठाकरे यांच्यासोबत असल्याचा दावा केला होता. नंतर त्यांनी शिंदे गटात सहभागी होणे पसंत केले. कोल्हापुरात दोन्ही खासदारांनी हीच वाट चोखाळलेली होती. त्यामुळे दोन्ही माजी आमदारांनी उद्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तर ते नवल ठरणार नाही. शिवसेनेला तिसरा धक्का मिळण्याची सुरुवात झाल्याचे हे द्योतक मानले जात आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.