November 27, 2022
गॅस सिलिंडर "डिलिव्हरी बाॅय" ला द्यावे लागतायेत अतिरिक्त पैसे; ग्राहकांची लूट थांबेना...

गॅस सिलिंडरच्या दरात नव्याने ५० रुपयांची वाढ केल्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. याचा ग्राहकांना मोठा भुर्दंड बसत आहे. विशेष म्हणजे दरवाढ होण्यापूर्वी ज्या ग्राहकांनी ऑनलाइन बुकिंगद्वारे सिलिंडर खरेदी केले होते, त्यांच्याकडूनही अतिरिक्त ५० रुपयांची मागणी हाेत आहे. या वाढीव दरासह खुशालीच्या नावाखाली गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉय ग्राहकांना लूटत असल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत

याबाबत विचारणा केली असता, दरवाढ होण्यापूर्वी बुकिंग केले असले तरी डिलिव्हरीच्या दिवशीचा दर लागू होईल, असे कंपन्यांचे अधिकारी सांगत आहेत. यावरून ग्राहकांच्या लुटीकडे कंपन्या कानाडोळा करत आहेत. दररोज अनेक ग्राहक गॅस सिलिंडर बुकिंग करत असतात. बहुसंख्य ग्राहक तंत्रस्नेही झाल्याने ते फोन पे, गुगल पे, एचपी पे आदी ॲपवरूनच गॅस बुकिंग करतात. लगेचच पैसेही पे करतात. त्यावेळची पूर्ण किंमत ग्राहक मोजतात. सिलिंडरची दरवाढ केव्हा होईल याची त्यांना कल्पनाही नसते. त्यामुळे बुकिंग केलेल्या दिवशीची दर आकारणी केली जाते. मात्र, बुधवारी झालेल्या दरवाढीपूर्वी बुकिंग केलेल्या ग्राहकांना दरवाढ झाल्यानंतर सिलिंडर दिले गेले. विशेष म्हणजे सिलिंडर देण्याच्यावेळी ग्राहकांकडून अतिरिक्त ५० रुपयांची मागणी डिलिव्हरी बॉय करत आहेत. त्यामुळे तीव्र वाद होत आहेत.

Gas Cylinder Delivery Boy

ग्राहकांनी सिलिंडर बुकिंग केल्यानंतर ते दोन दिवसांत देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, नियमांनुसार सात दिवसांचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानंतरही सिलिंडर न मिळाल्यास ग्राहक तक्रार करू शकतात. दरवाढीपूर्वी बुकिंग केलेले असले तरी ज्या दिवशी सिलिंडरची डिलिव्हरी हाेते, त्या दिवशीच्या पावतीवरील रक्कम ग्राहकाने द्यावी असा नियम आहे. बुकिंगनंतर दरवाढ झाली असेल तर डिलिव्हरी वेळी त्यातील तफावत रक्कम द्यावी. ती कमी असल्यास उर्वरित रक्कम ग्राहकाला परत दिली जाते. पेट्रोलियम मंत्रालयाच्या नियमांनुसार पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचे सूत्र सिलिंडरलाही लागू करण्यात आले आहे, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एचपी कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली.

किती पैसे परत केले हा प्रश्नच?

गॅस सिलिंडरचे दर १५ डिसेंबर २०२० पासून चढे राहिले आहेत. त्यापूर्वी जानेवारी ते नोव्हेंबर २०२० दरम्यान काही प्रमाणात घटले किंवा स्थिर होते. त्यामुळे या काळात कंपन्यांनी खरेच किती ग्राहकांनी किती पैसे परत केलेत हा खरा प्रश्न आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.