December 5, 2022
काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल…ओक्के मध्येय…!

सुरुवातीला मावा आघाडीच्या कार्यकर्त्यांना शहाजी बापू पाटीलच्या संवादातील काही ओळी वापरून फुटलेल्या सर्वच आमदारांची खिल्ली उडवायची होती पण सगळं बुमरॅंग झालं.

त्या माणसाचा ग्रामीण बोलीचा बाज लोकांना इतका आवडला की प्रत्येकजण स्वतः कडे असलेला डोंगरदऱ्यातला फोटो शोधून इथे डकवत आहे.

लोकांनी त्यांची १३ मिनिटांची क्लिप शोधून ऐकली.एव्हाना ती इतकी व्हायरल झाली आहे की शोधायची गरज पण आता राहिलेली नाही.

त्या आमदाराने त्याच्या वाट्याला आलेल्या राजकारणातील काही व्यथा सांगितल्या:

१. राजकारण करत असताना बायका लेकरांकडे किती दुर्लक्ष होतं हे त्याने सांगितले.

२. राजकारणामुळे १५० एकर बागायती शेतीचा काटा काढावा लागला हेही सांगितले आणि जेव्हा आमदारकी मिळाली तेव्हा वाट्याला आलेलं खच्चीकरण सांगितले.

३. बाळासाहेब ठाकरेंचे नाव एका उपसा सिंचन योजनेला देण्यासाठी १४ पत्रे पाठवूनही त्यावर हालचाल नाही म्हटल्यास यातून उद्धव ठाकरे स्वतःच्या वडिलांना किती किंमत देतात हेही समजलं.

४. पवार घराण्याबद्दल साडेतीन जिल्हे आणि मराठवड्यातील काही लाभार्थी सोडले तर लोकांच्या काय भावना आहेत हेही त्यानं सांगितले.एका जुन्या व्हिडिओत जेव्हा सोलापूरचे ५ TMC पाणी जेव्हा बारामती कडे नेण्याचा निर्णय होत होता तेव्हा शहाजी बापू पाटिल म्हणत होते की या पवारांनी धरणंच इथून उचलून तिकडं न्यायला पाहिजे… पाण्याच्या राजकारणावर साडे तीन जिल्ह्यावर कसं अधिपत्य गाजवलं जातं याचं मार्मिक विश्लेषण आहे हे.

५. बायकोला कधी लुगडं घेता आलं नाही या वाक्याचा शब्दश: अर्थ काढून शहाजी पाटिल यांना टार्गेट करणारे बरबाद पाटिल या फेसबूकवर मी बघितले.

६. आपली मतदारसंघातील कामं होतील या आनंदात तो माणूस रफिकभाईला बोलत होता.तसेच आपल्या प्रतिस्पर्धी गणपतराव यांच्याबद्दल त्याने काही माहिती दिली.शेवटी घराणेशाही करत स्वतःचा नातू ऐनवेळी कसा शहाजी पाटलांच्या विरोधात ऊभा केला गेला आणि त्याला कार्यकर्त्यांचा आग्रह हे नाव दिलं गेलं हेही सांगितलं.तब्बल ५ पेक्षा जास्त वेळा एका मुरब्बी राजकारण्याविरोधात पराभव पत्करून आपण कसे शेवटी निवडून आलो हेही तितकंच मनोरंजनात्मकरित्या सांगितलं गेलं.

७. शेवटी सगळ्याच राजकारण्यांना दारूचा नाद,बाईचा नाद आणि इतर जे जे नाद असतील ते असतातच.त्यामुळे कुणी दारू पिऊन बोलला म्हणून काही दारुडे इथे आभाळ झोपवताना दिसली.काहीना हे सगळं स्क्रिप्टेड वाटलं…असेलही स्क्रिप्ट पण त्यात खोटं काही बोलला आहे का तो माणूस? बाजूला स्टेजवर छत्री असताना पावसात भिजलेली स्क्रिप्ट सगळ्यांना आठवतेच की!

बाकी,

काय झाडी,
काय डोंगार,
काय हॉटेल…

ओक्के मध्येय…!

© रविकुमार सुभाषराव.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.