February 3, 2023
locals oppose for making masai plateau a forest protected area zws 70 | मसाई पठार संरक्षित राखीव क्षेत्र करण्यास स्थानिकांचा विरोध

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : निसर्गाची मुक्त उधळण, जैवविविधतेत परिपूर्ण भवताल, बौद्ध लेणी – पांडवदरासारखे धार्मिक महत्त्व, रानफुलांचे सौंदर्य अशा अनेक वैशिष्टय़ांनी युक्त मसाई पठार हे संरक्षित राखीव क्षेत्र करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचे पर्यावरणप्रेमी, पर्यावरण अभ्यासकांनी स्वागत केले आहे, तर त्या परिसरातील ग्रामीण भागातील लोकांनी विरोधाचे नारे सुरू ठेवले आहेत.

राज्यातील महत्त्वाच्या पठारमध्ये मसाई पठार हे नोंदले गेले आहे. बेसॉल्ट दगडाचा आणि त्याखाली जांभ्या दगडाचा थर पठाराला आहे. पन्हाळय़ालगतच २०० ते ८०० फूट रुंद अशा वेगळय़ा दहा पठाराने तो बनला आहे. कोकण व घाटावरील भागाच्या मधोमध मसाई पठार हे निसर्गरम्य स्थान आहे. ते पाचगणी टेबललँडपेक्षा दहापटीने मोठे मानले जात. येथे पांडवकालीन गुहा (पांडवलेणी) आहेत. मसाई देवीचे छोटेखानी पण सुंदर मंदिर आहे. या पठारास तलावांचे पठार असे म्हणतात. येथे दोन मोठय़ा आणि दोन लहान गुहा असून त्या इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात खोदल्या असाव्यात आणि तेथे बौद्ध धर्माचे शिक्षण दिले जात असावे अशी कागदोपत्री नोंद आढळते. पठाराच्या बाजूला २०० ते ६०० फूट खोल दरीमधून वाहणारे पाण्याचे जिवंत झरे पाहायला मिळतात.

पठार आकाराने मोठे असल्याने काही व्यावसायिक गणिते घातली जात आहेत. येथे पवनचक्कीद्वारा वीजनिर्मितीचा होता. त्यासाठी वारामापक यंत्र बसवले होते. याच पठारावर एके काळी विमानतळ उभारण्याची घोषणा तत्कालीन आमदारांनी केल्याने पठार आणखी चर्चेत आले होते. अलीकडे मसाई पठाराचा विकास होऊन पर्यटन केंद्र व्हावे म्हणून काही हौशी तरुणांनी पंचवार्षिक आराखडा केला आहे. त्यामध्ये प्रवासासाठी रस्ता, दऱ्याखोऱ्यात वृक्ष लागवड, प्रेक्षणीय स्थळे केंद्र (पॉइंट) तयार करणे, ईश्वर महादू तलावातील गाळ काढून तो खुला करणे, विश्रांतीगृह उभारणी आदींचा समावेश होता.

धार्मिक महत्त्व

मसाई पठार हे बौद्ध लेणी – पांडवदरा गुहा या धार्मिक कारणांनी महत्त्वपूर्ण बनले आहे. बौद्ध लेण्यांचे केंद्रीय पुरातत्त्व विभागाने संवर्धन करून त्याचे पर्यटनस्थळात रूपांतर करावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष व विचार संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीच्या वतीने दरवर्षी येथे गौतम बुद्धांची जयंती साजरी केली जात असल्याने प्राचीन बौद्ध अवशेषांचा विध्वंस थांबवून लेण्यांचे संवर्धन करण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची मागणी आहे. मसाई पठार हे संरक्षित राखीव क्षेत्र केल्याने जाचक नियम लागू होणार असतील तर त्यास विरोध केला जाईल, असे समितीचे अध्यक्ष टी.एस. कांबळे यांनी सांगितले.

विरोधी सूर..

कस्तुरीरंगन समितीच्या अहवालाप्रमाणे शाहूवाडी तालुक्यातील ५१ गावे प्रस्तावित संरक्षण क्षेत्रात समाविष्ट केली जाणार आहेत. पश्चिम घाटात समाविष्ट केलेल्या या गावांना त्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गतवर्षी जानेवारी महिन्यात केली होती. या गावांमध्ये बॉक्साइट खाणी मंजूर आहेत. त्यातून रोजगार, वाहतूक, हॉटेल व्यवसायातून उत्पन्नाची साधने निर्माण झाली असून त्यावर टाच येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. या पठारनजीकच्या१३ गावांचा विरोध असल्याचे पत्र वन विभागाकडे सादर केले असून शासनाच्या नव्या निर्णयास विरोध असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय बोरगे यांनी सांगितले. शिवसेनेच्या माजी आमदारांचा विरोध असतानाही शासनाने हा निर्णय घेतल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

पर्यावरणप्रेमींकडून मात्र स्वागत

मसाई पठार संरक्षित क्षेत्रात केल्यामुळे त्याचे स्वागत होत आहे. येथील जैवविविधतेचे संरक्षण होण्यास मदत होणार असल्याचे पर्यावरणप्रेमी व अभ्यासकांचे म्हणणे आहे. ‘सह्याद्रीच्या खोऱ्यात अशा प्रकारची वैशिष्टय़पूर्ण पठारे पाहायला मिळतात. लाव्हा रसापासून बनलेल्या या पठारावर ८० प्रकारची खुरटी झुडपे, सहाहून अधिक पक्षी, अनेक सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात. पावसाळय़ात जंगली श्वापदांना कीटकांचा त्रास होत असल्याने ते या पठाराचा आधार घेतात. अनावश्यक बांधकामे, रिसॉर्ट, विश्रामगृहे उभारू नयेत. शासनाने पठाराचे संरक्षण करण्यासाठी निधीही तत्परतेने दिला पाहिजे. बुद्ध लेणी. पांडवदरा यांचे धार्मिक विधी करण्यास अडचण नाही. कास पठारप्रमाणे येथे पर्यटकांचा बेधुंद गोंधळ सुरू राहिला तर तो थांबवण्यासाठी राज्य शासन, वन विभागाने पुढाकार घेतला पाहिजे,’ असे मत वनस्पती अभ्यासक डॉ. मधुकर बाचुळकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.