December 5, 2022
nana patekar praises minister hasan mushrif in kagal zws 70 | नेता बनला अभिनेता अन अभिनेता नेता!

कोल्हापूर : राजकीय नेते त्यांच्या अभिनिवेशात आणि अभिनेते त्यांच्या ढंगात पाहण्याची सवय लागलेली. पण कागलच्या मंचावर नेता-अभिनेता बनला; अन अभिनेता नेता! अभिनेते नाना पाटेकर आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील भूमिकांची अशी अदलाबदल उपस्थितांना सुखावून गेली. दोन्ही भूमिकांना टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला.

कागल येथे म. फुले, अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा अनावरण कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचू शकले नसल्याने सर्वांच्याच नजरा प्रमुख पाहुणे नाना पाटेकर यांच्यावर खिळल्या होत्या.

मंत्र्यांची डायलॉगबाजी

कार्यक्रमाचे संयोजक मंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त करताना महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. त्यानंतर या नेत्याच्या अंगी अभिनेता घुसला. मंत्री मुश्रीफ यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या चित्रपटातील संवाद म्हणून दाखवले. ‘ साले अपने खुद के देश में एक सुई नहीं बना सकते.और हमारा देश तोड़ने का सपना देखते हैं ’ हा पाकिस्तानवर संताप व्यक्त करणारा, तसेच ‘ बता इस में मुसलमान का कौन सा, हिन्दू का कौनसा बता? ’ या राष्ट्रीय ऐक्यावरील मुश्रीफ यांच्या डायलॉगबाजीला पाटेकर यांच्यासह उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद नोंदवला.

पाटेकरांना राजकारणाचे वेध

त्यानंतर वेळ आली होती नाना पाटेकर यांची. ‘ महापुरुषांचे पुतळे उभारून चालणार नाही. त्यांच्या विचाराने जाण्याची गरज आहे. २५ वर्ष मुश्रीफ निवडून येतात ही साधी गोष्ट नाही. पुढच्या निवडणुकीत ते उभे आहेत असे म्हंटले तर लोक निवडून देतील. पण सत्ताधाऱ्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत,’ असे नेत्यांच्या शैलीत पाटेकर यांनी भाषण केल्यावर त्यालाही लोकांनी प्रतिसाद दिला. इतक्यावरच न थांबता पाटेकर यांनी मुश्रीफ यांना ‘ तुम्ही अभिनयात या, मी राजकारणात येतो’ अशी टिप्पणीही केली. पाटेकर यांना काही संवाद म्हणण्याची विनंती केल्यावर त्यांनी हिंदी चित्रपटातील ‘ एक मच्छर, साला एक मच्छर इंसान को आदमी से हिजड़ा बना देता है ‘ आणि ‘ नटसम्राट ’ नाटकातील ‘ जगावं की मरावं हा एकच सवाल आहे ‘ हा संवाद सादर करून बाजी मारली.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.