December 5, 2022
Lovlina Borgohain Mental Harassment

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशा स्थितीमध्ये भारतीय खेळाडूंच्या चमूबद्दल धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. मादक द्रव्य सेवन (डोपिंग) प्रकरणी काही खेळाडू दोषी आढळले आहेत. अशाच आता भारताच्या आलिंपिक विजेत्या महिला मुष्टीयोद्ध्याने (बॉक्सर) आपला मानसिक छळ होत असल्याचा खुलासा केला आहे. तिच्या या खुलाश्यामुळे भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.

बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी मुष्टीयोद्धा लोव्हलिना बोरगोहेनने प्रशिक्षण प्रक्रिया कशी बाधित होत आहे, याबद्दल जाहिरपणे निराशा व्यक्त केली. प्रशिक्षण प्रक्रिया बाधित होत असल्यामुळे एक प्रकारे आपला मानसिक छळ होत असल्याचे तिचे म्हणणे आहे. याबाबत तिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे.

“मी अत्यंत वाईट वाटते आहे की, माझ्या प्रशिक्षकांना काढून टाकून मला सतत त्रास दिला जात आहे. देशासाठी ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या माझ्या प्रशिक्षकांना सतत काढून टाकल्याने माझ्या प्रशिक्षण प्रक्रियेवर परिणाम होत आहे. माझ्या दोन प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या संध्या गुरुंग द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त आहेत. असंख्यवेळा विनंती केल्यानंतर माझ्या दोन्ही प्रशिक्षकांना शेवटच्या क्षणी शिबिरांमध्ये सामील करण्यात आले. या क्षणी, प्रशिक्षक संध्या गुरुंग यांना राष्ट्रकुल खेळांच्या ठिकाणी येता आलेले नाही. कारण, अद्याप त्यांना येथे प्रवेश मिळालेला नाही. माझ्या दुसऱ्या प्रशिक्षकालाही भारतात परत पाठवण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा तोंडावर आलेली असताना माझी प्रशिक्षण प्रक्रिया थांबली आहे,” अशी पोस्ट लोव्हलिनाने केली आहे.

हेही वाचा – वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत भारताने मोडला पाकिस्तानचा विश्वविक्रम!

ती पुढे असेही म्हणाली, “अनेकदा विनंती करूनही असे घडले आहे. त्यामुळे मला प्रचंड मनस्ताप झाला असून हा मानसिक छळच आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास मी माझ्या खेळावर कसे लक्ष केंद्रित करू हे मला समजत नाही. याच कारणामुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत माझी कामगिरी उंचावली नाही. आणि आता याच राजकारणामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही संधी धूसर होताना दिसत आहे. मला आशा आहे की, मी या राजकारणावर मात करून देशासाठी पदके आणू शकेल.”

लोव्हलिनाच्या पोस्टची क्रीडा मंत्रालयाने तत्काळ दखल घेतली आहे. क्रीड मंत्रालयाने ट्वीट केले की, “आम्ही भारतीय ऑलिंपिक संघटनेला ताबडतोब लोव्हलिनाच्या प्रशिक्षकांना मान्यता मिळण्यासाठी व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.”

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडीयाने (बीएफआय) सोमवारी एक निवेदन जारी केले आहे. त्यातील नियमांनुसार खेळाडूंच्या संख्येच्या केवळ ३३ टक्के सपोर्ट स्टाफला परवानगी आहे. भारतीय बॉक्सिंग दलात १२ खेळाडू आहेत (आठ पुरुष आणि चार महिला). या नियमानुसार, सपोर्ट स्टाफची संख्या चार होते. यामुळे लोव्हलिनाच्या प्रशिक्षकांना तिच्यासोबत थांबता आलेले नाही.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.