December 5, 2022
Hardik Pandya ODI Retirement

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या जबरदस्त कामगिरी करत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामापासून तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. असे असूनही त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्रींच्या वक्तव्यानंतर पंड्याच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगली आहे. २०२३च्या विश्वचषकानंतर हार्दिक पंड्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, असे शास्त्री म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी इंग्लिश अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने वयाच्या ३१व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर, कमी वयात खेळाडू क्रिकेटला रामराम का ठोकत आहेत? या प्रश्नावर अनेक माजी खेळाडूंनी आपापली भूमिका मांडली आहे. क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंवर दबाब येत असल्याचे माजी क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे. याच मुद्द्यावर रवि शास्त्री यांनीही आपले मत मांडले आहे.

हेही वाचा – पंड्या कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन; हार्दिकच्या अगस्त्यला मिळाला छोटा भाऊ

एका अग्रगण्य मासिकाशी संवाद साधताना शास्त्री म्हणाले, “भविष्यात हार्दिक पंड्या आपले संपूर्ण लक्ष टी २० क्रिकेटवर केंद्रित करू शकतो. आणि फक्त पंड्याच नाही तर भविष्यात अनेक खेळाडू फक्त एकाच फॉरमॅटला प्राधान्य देऊ शकतात. हार्दिकला टी २० क्रिकेट खेळायचे आहे, याबाबत त्याचे विचार स्पष्ट आहेत. त्यामुळे पुढील वर्षीच्या विश्वचषकानंतर कदाचित तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीही स्वीकारू शकतो.”

शास्त्री असेही म्हणाले, “भविष्यात फ्रँचायझी क्रिकेटचे वर्चस्व राहणार आहे. या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तुम्ही क्रिकेटपटूंना जागतिक लीगमध्ये खेळण्यापासून रोखू शकत नाही. जोपर्यंत जगभरातील सर्व देश आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक कमी करत नाहीत, तोपर्यंत क्रिकेटपटू एखादा फॉरमॅट सहज सोडताना दिसतील.”

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.